Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

‘अग्रे पश्यामी’ भव्य नृत्यनाट्याने भारावले रसिक!

 

पुणे : ‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे आयोजित, ‘अग्रे पश्यामी’ या भव्य नृत्यनाट्याच्या प्रभावी सादरीकरणाने शनिवारी सायंकाळी रसिक भारावून गेले. पुण्यात प्रथमच करण्यात आलेल्या या नृत्यनाट्यात चेन्नईच्या ४० पेक्षा जास्त नृत्यकलाकारांचा समावेश होता.दि.२५ मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता अण्णा भाऊ साठे सभागृह(पद्मावती) येथे हे नृत्यनाट्य सादर झाले.

श्रीविष्णूच्या कूर्म,वराह,नृसिंह,राम आणि कृष्ण या अवतारांचं वर्णन भरतनाट्यम,मोहिनीअट्टम,कुचीपुडी आणि कृष्णाट्टम कली या नृत्यशैलींच्या माध्यमातून या नृत्य नाट्यात साकारले गेले.संस्कृत,तमिळ,मल्याळी,कानडी,तेलगू आणि मराठी अशा ६ भाषेतील निवडक रचनांना १० प्रतिभावान संगीतकारांनी दिलेले, ४० वेगवेगळ्या रागमालांमधील संगीत,अतिशय सुंदर रंगभूषा,वेशभूषा ही नृत्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरली.एस .सुब्रमण्यम, (अध्यक्ष,पूना संगीत सभा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नृत्यरचनाकार अनिता गुहा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘नृत्ययात्री’च्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले.डॉ.किरण ठाकूर, डॉ.सुचेता भिडे – चापेकर, मनीष साबडे आदि मान्यवर उपस्थित होते.आकांक्षा शिंदे यांनी सूत्र संचालन केले.

या निमित्ताने शास्त्रीय नृत्याच्या इतिहासात प्रथमच ‘नारायणीयम’ हे नृत्यनाट्याच्या स्वरूपात सादर झाले.’नारायणीयम्’ नावाच्या संस्कृत काव्यावर हे नृत्यनाट्य आधारित होते.

प्रसिद्ध वक्ते,प्राचीन वैदिक ग्रंथांचे लेखक, संशोधक आणि दिग्दर्शक श्री दुष्यंत श्रीधर यांनी या नृत्यनाट्याची संहिता तयार केली .भरतनाट्यम नृत्य शैलीतील प्रसिद्ध गुरु श्रीमती अनिता गुहा यांची नृत्यसंरचना होती.संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. राजकुमार भारती यांची संगीतरचना होती.साऊंडस्केप डिझाइन श्री साई श्रवणमचे होते.

सुमधुर अशा संस्कृत काव्यरचनांसाठी ओळखले जाणारे नारायण भट्टातीरी नावाचे प्रतिभावान कवी केरळमध्ये सोळाव्या शतकात होऊन गेले.

त्यांनी भागवत पुराण संक्षिप्त स्वरूपात आणून एकूण दहा दहा श्लोकांच्या शंभर दशकांमध्ये त्याची केलेली काव्यरचना म्हणजेच ‘नारायणीयम्’ हे काव्य आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading