Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सूर आणि लयीच्या सुंदर मिलापात रसिक मंत्रमुग्ध

पुणे : मनाचा ठाव घेणारे शास्त्रीय संगीत…सूर आणि लयीचा होणारा सुंदर मिलाप…राग सादर सादर होताना तल्लीन झालेले श्रोते…सुरेल गायकी आणि त्यासोबतच अप्रतिम वादनाला दिलेली दाद यामुळे २५० वे  वर्षे साजरे करणाऱ्या सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात  ख्यात शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांची शास्त्रीय संगीताची सुरेल मैफल रंगली.

सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर यंदा द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष  साजरे करत आहे. महोत्सवात मंजुषा पाटील यांनी गायन सेवा दिली. यावेळी मंदिराचे अभिजित जोशी, अद्वैत जोशी उपस्थित होते.

राग भूपाली मधील तीन तालाने कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा पाटील यांनी केली. राग भूपाली मध्ये ‘जब से तुम संग लागली’ ही बंदिश त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केली. बहारदार गायन त्याला समर्पक असे वादन यामुळे रसिकांना दुहेरी आनंद मिळाला. शास्त्रीय संगीता सोबतच ‘नजरिया लागे नही कही और’ ही ठुमरी त्यांनी आपल्या दमदार आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

मंजुषा पाटील यांनी गायलेली राग सोहनी मधील मध्य लयीची ‘काहे अब तुम आये हो’ या बंदिशीने रसिकांवर स्वर मोहिनी घातली. ‘छंद लागला मजला विठ्ठल नामाचा’ या अभंगाच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

अभिजित जोशी म्हणाले, पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव बळवंत फडकेंचा सहवास लाभलेले सदाशिव पेठेतील लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे. मंदिर यंदा २५० वे वर्ष साजरे करत आहे. महाराष्ट्रात आणि भारतात लक्ष्मी नृसिंहाची मंदिरे मोजकीच आहेत. अशाच काही मोजक्या मंदिरांपैकी एक मंदिर पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. वासुदेव बळवंत फडके १४ वर्षे वास्तव्यास होते. वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे शिकाण्यासाठी आणि चर्चेसाठी लोकमान्य टिळक नेहमी मंदिरात येत असत. अक्कलकोटचे स्वामी समर्थ ह्या मंदिरात तीन वेळा येऊन गेले आहेत. सज्जनगडचे श्रीधर स्वामी उपासनेला मंदिरात बसत असत. गोंदवलेकर महाराज देखील येथे येऊन गेले असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading