Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

गायन-वादनाने रसिकांवर स्वरानंदसरींचा वर्षाव

पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका रेवा नातू यांनी सादर केलेले खयालनुमा, तराणा, रागमाला, चतरंग तसेच ज्येष्ठ संवादिनीवादक, अभ्यासक डॉ. अरविंद थत्ते यांनी सादर केलला पंजाबी ठेका आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांनी सादर केलेल्या कौशिकरंजनी, टप्पा, ठुमरीनुमा अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून रसिकांवर स्वरानंदसरींचा वर्षाव झाला.

भारतीय संगीत प्रसारक मंडळ संचलित गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 92व्या वर्धापनदिनानिमित्त महाविद्यालयाच्या विष्णु विनायक स्वरमंदिरात ‌‘टप्पा, तराणा, त्रिवट, चतरंग, ठुमरी, दादरा‌’ या गायन-वादनाच्या विशेष समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. समारोहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटन बडवे इंडस्ट्रीजच्या संचालिका सुप्रिया बडवे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्य परिणिता मराठे, उपाध्यक्ष रवींद्र आपटे उपस्थित होते.

सुप्रिया बडवे म्हणाल्या, महाविद्यालयाचा 92 वर्षांचा प्रवास स्पृहणीय आहे. हा एक सांगीतिक यज्ञ आहे. संगीत शिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना करणे महत्त्वाचे आहे; परंतु हे कार्य सातत्याने सुरू ठेवणे अभिनंदनीय आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांवर संगीताचे संस्कार होत असल्यामुळे येथून घडलेले कलाकार जागतिक स्तरावर रसिकमान्य ठरत आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या समारोहाची सुरुवात रेवा नातू यांनी राग हमीरमधील खयालनुमाने केली. त्यानंतर पंडित बळवंतराय भट्ट रचित आडाचौतालातील ‌‘ये दानी दारा‌’ हा तराणा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‌‘दुर्गा माता दयानी देवी‌’ या तीन तालातील रागमालेच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. मैफलीची सांगता राग अडाणा-तीनतालातील चतरंगमध्ये ‌‘होरी होरी खेलत नंदलाल‌’ या रचनेने केली. प्रशांत पांडव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), वैष्णवी सोनार (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर डॉ. अरविंद थत्ते यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद करून पंजाबी शैलीतील तीन टप्पे अतिशय प्रभावीपणे सादर करत रसिकांना मोहित केले. आपल्यावर टप्पा वादनाचे संस्कार पंडिता मालिनी राजुरकर व पंडित शरद साठे यांनी केले असा आदराने उल्लेख करून डॉ. थत्ते यांनी मारुबिहाग रागातील स्वरचित टप्पा सादर केला. त्यानंतर काफी रागातील पारंपरिक टप्पा सादर करताना मिश्र काफीच्या माध्यमातून बागेश्री रागाचा अंशही वादनातून दर्शविला. किरवाणीतील टप्पा द्रुत लयीसह जोड या सादरीकरणाने त्यांनी वादनाची सांगता केली. भरत कामत (तबला) यांनी समर्पक साथ केली.

कल्पना झोकरकर यांनी सादरीकरणाची सुरुवात कौशिकरंजनी या अप्रचलित रागातील ‌‘ए रि माई पिया परसेद गमन‌’ या बंदिशीने केली. त्यानंतर खमाजमधील टप्पा सादर करताना ‌‘वारी जांदी मै‌’ ही बंदिश सादर केली. ‌‘अपने पिया को जाने ना दुंगी, आज मै लडुंगी गुंह्या‌’ या भैरवीनंतर ‌‘मय ना लडी थी सैंया निकस गये‌’ हे ठुमरीनुमा भजन सादर करून सादरीकरणाची सांगता केली. खुला आवाज, दमदार ताना, सुरेल स्पष्ट उच्चार या गायन वैशिष्ट्यांमुळे रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मानसी पोतदार, चेतना खळे-तौकर (तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.

कलाकारांचा सत्कार सुप्रिया बडवे, प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी केला. सुप्रिया बडवे यांचा सत्कार उपप्राचार्य परिणिता मराठे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायक फाटक यांनी पंडित प्रमोद मराठे यांचा सन्मान केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading