मोदी सरकाने व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडवली: अभिषेक मनू सिंघवी
पुणे : मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे. 2004 ते 2014 या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मोदी सरकारने ठेवली नाही, त्यामुळे मोदी सरकार देशातून हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व जेष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केले. जगभरात भारताची प्रतिमा उंचावलेली होती मात्र पंतप्रधान मोदी यांनी ती घालवली आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली. व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती मोदी सरकारने विस्कटली आहे. ती पुन्हा बसवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी रविंद्र धंगेकर यांना बहुमताने निवडून द्या, असे यावेळी त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा मुकुंद नगर येथे ३डी बँक्वेट येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी सिंघवी बोलत होते. यावेळी विठ्ठलशेठ मणियार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. अभय छाजेड, पोपटलाल ओस्तवाल, पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, ज्येष्ठ व्यापारी राजेश शहा, राजेंद्र बाठीया, राजेंद्र फुलपगर, राजेंद्र गुगुळे, शांतीलाल कटारिया, जनक व्यास, भोला अरोरा, भारत सुराणा, वालचंद संचेती, मिलिंद फडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल, माजी नगरसेविका संगीता तिवारी, हिरालाल राठोड, बाळासाहेब भुजबळ आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
प्रस्ताविक काँग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, मोदी सरकारने देशाची आर्थिक परिस्थिती बिघडवली. जीएसटी सारख्या जाचक अटी आणल्या. कोरोना काळात व्यापाऱ्यावर निर्बंध घातले. त्यामुळे मोदी सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी एका दिलाने रवींद्र धंगेकर यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धंगेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, मोदी सरकारला आपली सत्ता जाण्याची भीती आहे म्हणूनच पहिल्यापासून 400 पार चा नारा त्यांनी दिला आहे. आता समाजाने जागरूक होऊन भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारच्या काळात तरुणांना बेरोजगारी तसेच सामन्यांना आर्थिक घडी विस्कटलेलीचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील मोदी जगभर फिरून आपली प्रतिमा उंचावलेली दाखवतात. परंतू भारताची प्रतिमा मोदींनी घालवलेली आहे. देश पुढे नेण्यासाठी तसेच प्रगतीपथावर आणण्यासाठी इंडिया आघाडीला सत्तेत आणावे. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भाजपची सत्ता उलथून टाकावी असे, आवाहन यावेळी त्यांनी केले.
लोकशाही संपवण्यासाठी मोदींनी घाट घातला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ भाजप संपवत आहे. माध्यमे मोदी सरकारने हातात घेऊन त्यांचा हवा तसा वापर करत आहे. निवडणूक आयोग ईडीचा वापर आपल्या हितासाठी करत आहे, हे लोकशाहीसाठी चिंताजनकबाब आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
वालचंद संचेती म्हणाले रवींद्र धंगेकर गोरगरिबांच्या कामाला येणारा सामान्य कार्यकर्ता आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते निवडून आले आहेत. आता पुणे लोकसभा मतदारसंघात खासदारकीला विजयी होणार आहेत. तळागाळातील नागरिक त्यांना निवडून देणार आहेत. कार्यक्रमाचे आभार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी मांडले.
