Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सांस्कृतिक परंपरा जतन करत आहेत पुणेकर रसिक : डॉ. जगन्नाथ दीक्षित

पुणे : पुणे हे सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर असून ही परंपरा जतन करण्याचे काम पुणेकर रसिक अव्याहतपणे करत आले आहेत. रसिकांच्या प्रतिसादामुळे संगीत नाटकांची परंपरा प्रवाहित राहिली आहे. मी देखील वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला दरवष हजेरी लावून नाटकांचा आनंद घेईन, असे प्रतिपादन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

सुमारे 130 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर या नाट्य संस्थेच्या 32व्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आज (बुधवारी) सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वि. वा. शिरवाडकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‌‘ययाती आणि देवयानी‌’ हे नाटक सादर झाले. महोत्सवाचे उद्घाटन डॉ. दीक्षित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. त्या नंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह संजय डोळे, विश्वस्त प्रदीप रत्नपारखी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते करण्यात आला.

महोत्सवात दि. 9 रोजी सं. मानापमान, दि. 10 रोजी सं. लावणी भुलली अभंगाला, दि. 11 रोजी सं. सौभद्र आणि दि. 12 रोजी सं. कट्यार काळजात घुसली या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. पारंपरिक, लोकप्रिय तसेच सामाजिक विषयांवरील नाट्यकृती सादर करण्याची भरत नाट्य संशोधन मंदिराची परंपरा आहे. संस्थेची दहापेक्षा अधिक नाटके तयार असून त्यातील नाटके महोत्सवात सादर करण्यात येत असल्याचे भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading