Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरी’द्वारे हिंदी भाषिकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचविण्याचा प्रयत्न

कृष्णा राजाराम अष्टेकर लिखित ‘मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरी’च्या नव्या आवृत्तीचे लोकार्पण

पुणे : उत्तरेकडील अनेक संत आणि भक्त ज्ञानेश्वरी समजून घेण्यास इच्छुक आहेत. मात्र, हिंदी भाषेत जसा पाहिजे तसा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला गेला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त हिंदी भाषिक नागरिकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचावी, या उद्देशाने मराठवाडी हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी, हिंदी भाषेतील श्री ज्ञानेश्वर चरित्र लिहिले अशा भावना या ग्रंथांचे लेखक कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी व्यक्त केल्या.

गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात यावेळी कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी लिहिलेल्या मराठवाडी हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी, प्राकृत मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी आणि हिंदी भाषेतील श्री ज्ञानेश्वर चरित्र यांचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्वे रस्त्यावरील स्वामी कृपा सभागृह येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अशोक कामत, प्रसिद्ध वक्ते मिलिंद सबनीस, दिव्य ज्योती संस्थेचे चिन्मय स्वामी, राधिका अष्टेकर, राज अष्टेकर, शिवराज अष्टेकर आदी यावेळी उपस्थित होते. यासोबतच आरती मोने यांच्या ‘अंतरीची अक्षरे’ या ग्रंथाचे प्रकाशन देखील संपन्न झाले.

कार्यक्रमा दरम्यान बोलताना अष्टेकर म्हणाले, “ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या प्रत्येकालाच आत्मस्वरूपाचा आनंद देतो. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र हे भारावून टाकणारे आहे. ते कानावर पडले तरी व्यक्तीच्या वृत्तीत बदल होतो. म्हणून ते जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे हा आमचा उद्देश आहे.”

भारतात ज्या पद्धतीची वाड्मय परंपरा आपण पाहतो तशी इतर कोणत्या देशात खचित पहायला मिळते. आपला इतिहास नव्या पिढी समोर येणे महत्त्वाचे आहे. हे झाले तरच आपच्या पिढीतील हतबलता, अतिदुर्बलता आणि करंटेपणा नष्ट होईल, असे परखड मत डॉ अशोक कामत यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमा आधी डॉ मिलिंद सबनीस यांचे ‘प्रदेशगीत, राष्ट्रगीत आणि विश्वगीत : पसायदान’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रगीत, राष्ट्रगीत आणि पसायदान यांचा इतिहास, संदर्भ, महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले.

मराठवाडी हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी, प्राकृत मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी आणि हिंदी भाषेतील श्री ज्ञानेश्वर चरित्र जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी अष्टेकर स्वत: त्याचा उत्तर भारतात प्रसार करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रतिष्ठानच्या समन्वयिका शुभदा वर्तक यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading