fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsPUNE

भाजपसोबत आपल्याला जायला पाहिजे असे म्हणणारा अचानक कसा पलटला; प्रफुल पटेल यांचे डॉ. कोल्हेंवर टीकास्त्र

 

मंचर – लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.  या देशाचा विकास कोणी केला तर मोदींनी. त्यामुळे भाजपसोबत आपल्याला जायला पाहिजे असे म्हणणारा अचानक कसा पलटला, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडले.

महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ मंचर येथे आयोजित प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल  बोलत होते. आमदार अतुल बेनके,  देवेंद्र शहा, भीबाळासाहेब बेंडे, विष्णूकाका हिंगे, मानसिंग पाचुंदकर,  विवेक वळसे पाटील, अरुण गिरे,  मंगलदास बांदल, अपूर्व आढळराव, पूर्वा वळसे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर या सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल  म्हणाले की, खासदार झाल्यावर तीन वर्षांनी अमोल कोल्हे माझ्याकडे आले. म्हणाले मला खासदार रहायचं नाही, लोकांना वेळ देता येत नाही. नंतर या देशाचा विकास कोण करु शकेल तर नरेंद्र मोदी. असे सांगून आपल्याला भाजपबरोबर जायला पाहिजे असंही म्हणाले होते. जे दोन जुलैला अजितदादांच्या शपथविधीला आले, अॅफिडेवटवर सही केली आणि नंतर दुसरीकडे गेले, असा एका ठिकाणी स्थिर नसणारा माणूस आपल्या कामाचा नसतो, अशा शब्दांत त्यांनी कोल्हेवर सडकून टीका केली.

सहकारमंत्री वळसे पाटील म्हणाले, आपल्याकडे राजकीय बदल जे झाले त्याची तयारी दोन वर्षांपासून सुरु होती. ही भूमिका व्यक्तीगत लढाई म्हणून नव्हती; तर मोदींच्या पाठींब्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी महायुतीत सामील झालो. निवडणूक सोपी असली तरी सहजपणाने न घेता गाव, वाडी वस्तीत जाऊन प्रचार करा, कोणी नाराज असेल तर त्याला दुरुस्त करा.

अतुल बेनके म्हणाले, ज्याला निवडून दिलं तो म्हणायचा खासदाराचं काम गल्लीत नाही तर दिल्लीत आहे. पण हे लोकांना काहीही सांगून गायब झाले. आता कामाचा माणूस, अनुभवी माणूस आढळराव यांना आपल्याला दिल्लीत पाठवायचे आहे. कोल्हे यांनी माझी गल्फ देशात कंपनी आहे, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा समाचार घेताना  बेनके म्हणाले की, सिद्ध करा जनतेसमोर आणा. खरे असेल तर मी सार्वजनिक, राजकीय जीवनातून बाहेर जाईन.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading