सामाजिक विकासासाठी सीएसआर हेल्पलाइन गरजेचीसोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे सीएसआर प्रकल्प
व्यवस्थापन कार्यशाळेत तज्ञांचे मत ; सीएसआर हेल्पलाइन नोंदणी चा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्रामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो सामाजिक संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक विकासाचे काम सुरू असते. या संस्थांना मोठ्या कंपन्या तसेच शासन यांच्याशी जोडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून अनेक सामाजिक विकासाची कामे होत आहेत. त्यामुळे सामाजिक विकासासाठी सीएसआर प्रकल्प योजना अत्यंत गरजेची असून प्रत्येक सामाजिक संस्थेने सीएसआर प्रकल्प योजनेची माहिती घेणे गरजेचे आहे, असे मत सीएसआर प्रकल्प योजना कार्यशाळेतील तज्ञांनी व्यक्त केले.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित राष्ट्रीय कर्तव्य अभियानांतर्गत फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या सहयोगाने सीएसआर प्रकल्प व्यवस्थापन कार्यशाळा आणि सीएसआर हेल्पलाइन नोंदणी चा शुभारंभ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यातून ४०० पेक्षा अधिक सामाजिक संस्था प्रतिनिधी यांनी यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
दिलीपसिंग बायस, डॉ. संजय गांधी, कार्यक्रमाचे संयोजक विजय वरुडकर, डॉ. दयानंद सोनसाळे, अनिल नाईक, डॉ आशिष पोलकडे, अमेय देशपांडे, बाळासाहेब दरेकर, अभय भंडारी, सुनील बेनके, राहुल हनवते या तज्ञांनी सामाजिक संस्थांना या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. पौर्णिमा कुलकर्णी, सागर पाटील, चेतन मराठे, विशाल वरूडकर, वीणा पराडकर स्वप्नील गंगणे, सुनीता बेनके, सुधीर बिक्कड यांनी कार्यशाळा व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न केले.
दिलीप सिंग बायस यांनी सांगितले की सीएसआर हेल्पलाइन हे व्यासपीठ सामाजिक संस्था साठी विशेष लाभदायी योजना आहे .ही काळाची गरज आहे. जसे वर्तमानात वाढत्या सामाजिक समस्या निवारणासाठी सक्षम आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. त्या साठी सामाजिक संस्थांना योग्य मार्गदर्शनाची व निधीची गरज आहे, या विचारातूनच ही कार्यशाळा सर्वांना फायदेशीर आहे. सी एस आर उभारणी चे अनुभव कथन त्यांनी केले.
डॉ. दयानंद सोनसाळे म्हणाले, संपूर्ण देशातील सीएसआर फंडाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांपैकी ३० टक्के खर्च हा महाराष्ट्र मध्ये करण्यात येतो महाराष्ट्राच्या सामाजिक विकासामध्ये सामाजिक संस्था आणि त्यांना मदत करणाऱ्या कंपन्या तसेच शासनाचा मोठा हातभार आहे. दरवर्षी या माध्यमातून सुमारे १५,००० कोटी रुपयांच्या सामाजिक काम केली जातात. महिला आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत सी एस आर फंडच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांची सामाजिक संस्थांनी माहिती घ्यावी आणि त्यानुसार जिल्हा कार्यालयाशी समन्वय साधून कार्य केल्यास त्यांना शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प मिळू शकतात.
डॉ. संजय गांधी म्हणाले, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी स्किल डेव्हलपमेंट कडे लक्ष देणे गरजेचे आहे. २०१५ ते २०२१ या काळामध्ये सीएसआर फंडिंग च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सामाजिक संस्थांनी १५००० कोटी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करिअर निर्माण होऊ शकतो या विचाराने तरुणांनी सामाजिक विकास क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
बाळासाहेब दरेकर म्हणाले, सामाजिक समूह निधी कौशल्य विकास क्षेत्रामध्ये तरुणांना अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.
अनिल नाईक म्हणाले, सामाजिक संस्थांनी कंपन्यांकडे सीएसआर फंडिंग मिळवण्यासाठी अर्ज करताना प्रकल्प व्यवस्थापन विषयी योग्य आखणी केली पाहिजे. व्यवसायिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आपण ज्या कंपन्यांकडे मदत मागतो त्या कंपन्यांची माहिती तसेच इतिहास जाणून घेतला पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करीत त्याची समाजाला किती गरज आहे हे पटवून देण्यासाठी व्यावसायिक स्किल असणे गरजेचे आहे.
अमेय देशपांडे यांनी सीएसआर निधी उभारणीसाठी कायदेशीर प्रक्रिया, आवश्यक पूर्व तयारी तसेच मागील दहा वर्षात सीएसआर निधी खर्च आढावा विषयी माहिती दिली. डॉ. आशिष पोलकडे यांनी पर्यावरण क्षेत्रातील विविध करिअर संधी व निधी उभारणी चे पर्याय या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक विजय वरुडकर म्हणाले, सामाजिक संस्थांची समाजाला मोठी गरज आहे. या संस्थांच्या माध्यमातूनच विविध विकासाची कामे होत आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्यासही मदत होत आहे. सामाजिक संस्थानी सीएसआर हेल्पलाईन म्हणून ७४४७४८७४८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. अभय भंडारी यांनी प्रास्ताविक केले. तर सुनील बेनके यांनी आभार मानले.
