व्यावसायिक नटांना घेऊन मराठीत लोकनाट्ये व्हायला हवीत – सुमीत राघवन
पुणे : लोककला टिकवायची असेल तर लोककलाकार आणि आजचे व्यावसायिक नट यांना एकत्र घेत लोकनाट्ये व्हावीत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी केले. निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलारंग महोत्सवात निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी सुमीत राघवन यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात ख्यातनाम अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते सदर सन्मान राघवन यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानाचे हे सलग दुसरे वर्ष असून रोख रुपये २१ हजार, उपरणे, गांधी टोपी आणि रोप असे या सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमावेळी बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले- थत्ते, राजेश दामले आदी मान्यवर उपस्थित होते.
निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकाराप्रती आदर व्यक्त करणे, यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांपेक्षा मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे आणि ही परंपरा अशीच पुढे चालावी या कल्पनेने मागील वर्षीचे कृतज्ञता सन्मान सन्मानार्थी सचिन खेडेकर यांच्या हस्ते यावर्षी सुमीत राघवन यांचा सन्मान करण्यात आला.
आज प्रेक्षकांना जिवंत कला पाहण्याची नशा आहे, त्यामुळे नाटक पाहणारे प्रेक्षक हे चित्रपटाला जाणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा अधिक असतात असे मला वाटते असे सांगत सचिन खेडेकर म्हणाले, “आज कलाकाराने प्रेक्षकाभिमुख काम करायला हवे. प्रत्येक चांगल्या कलाकृतीला रसिक प्रेक्षक हे न्याय देतातच यावर माझा विश्वास आहे. कलाकाराने कलाकार म्हणून मेहनत घ्यायला हवीच शिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून सामाजिक भान जपण्यावरही भर द्यायला हवा. कलाकारापेक्षा चांगला माणूस बनण्यावर त्याला जादा मेहनत घ्यावी लागते हेही लक्षात घायला हवे.”
नटाचे आयुष्य हे कायमच परावलंबी असते. तो सतत कोणा ना कोणाच्या तरी सूचना ऐकत असतो. मात्र तो त्या सूचना किती ओळखतो, स्वत:मध्ये किती भिनवतो, किती सादर करतो यावर अनेक गोष्टी ठरतात असेही खेडेकर यांनी नमूद केले.
मोठा माणूस असे ज्या निळू फुले यांना संबोधले जाते त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे आपण केलेल्या कामाची पावती मिळण्यासारखे आहे असे मला वाटते असे सांगत पुरस्काराला उत्तर देताना सुमीत राघवन म्हणाले, “कलाकारा व्यतिरिक्त माणूस म्हणून आपण काय करतो आहोत याचे भान राखण्याचा प्रयत्न मी कायम करतो, याचीच पावती या पुरस्काराने मिळाली. कलेच्या माध्यमातून एक कलाकार म्हणून आम्ही व्यक्त होत असतोच मात्र त्याही पलीकडे जात घराबाहेर पाऊल टाकल्यावर माणूस म्हणून आपण कसे वागतो याचे भान मी आणि चिन्मयी कायम बाळगतो. तीन तासांपलीकडे २१ तास आपण एक माणूस म्हणून काय करतो हे आमच्यासाठी कायमच महत्त्वाचे राहले आहे.”
पुरस्काराला उत्तर द्यायला राघवन उठले असता गांधी टोपी ही निळू फुले यांची ओळख आहे त्यामुळे टोपी घाला असा सल्ला उपस्थित प्रेक्षकांनी सुमीत राघवन यांना दिला त्यावर टोपी घालत राघवन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज पार्ल्याला मिनी पुणेच म्हणतात त्यामुळे पुण्याच्याच कलाकाराला हा पुरस्कार मिळाला आहे असे राघवन यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
निळू फुले यांची भेट झाली नाही किंवा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही मात्र, निळू भाऊ हे ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका आवडीने पहायचे हे आज कळल्यानंतर त्यांनी माझे काम पाहिले आहे याचे सामाधान आहेच शिवाय मला मूठभर मांस चढले आहे. आता निळू फुले या पुरस्कार रूपाने आजन्म सोबत असतील असेही राघवन यावेळी म्हणाले.
यावेळी राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये सुमीत राघवन यांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला ते म्हणाले, “आज मराठीत अनेक माईलस्टोन नाटके आहेत आणि असे प्रयोग चालू रहायला हवेत. आज आपल्याकडे थिएटरची अवस्था फार चांगली नाही. रंगभूमी विषयी आस्था असणारी थिएटर दिसत नाहीत. देश विदेश फिरणारे आपण कलाकार जेव्हा परदेशात जातो तेव्हा त्यांची थिएटर पाहून आपण अवाक होतो. त्यांचे बॅकस्टेज पाहिल्यावर हे असे असते का हा प्रश्न आपल्याला पडतो. पाश्चात्य देशात पुनर्बांधणी नाही तर संवर्धन महत्त्वाचे मानल्या जाते आपल्याकडे त्याबद्दल उदासीनता आहे. थिएटरच्या या अवस्थेला प्रेक्षक आणि कलाकार दोघे दोषी आहेत असे मला वाटले.”
आज इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत यावर कलाकाराला मुख्य भूमिका मिळते ही त्रासदायक गोष्ट आहे, असे परखड मत राघवन यांनी व्यक्त केले.
माझ्या प्रवासात मला कुटुंबाला साथ मिळाली. आई वडील आणि माझा मोठा भाऊ कायमच पाठीशी उभे राहिले आणि मी हे कधीच विसरु शकत नाही. आई वडिलांमुळे मी घडलो. माझ्या यशाचे श्रेय त्यांना जाते. मी फिल्मी कुटुंबातला नाही. मी अंधारात चालत होतो. आई वडिलांनी मला कला क्षेत्रामध्ये मदत केली. मी कला शिकत राहिलो. त्यात मला उर्दू शिकल्याचा फायदा झाला. आई वडिलांना व्हिजन होती. त्यांनी कला शिकण्यास प्रोत्साहित केले अशा आठवणी राघवन यांनी जागविल्या.
मराठी चित्रपटांवर नटाचे पोट भागू शकत नाही त्यामुळे त्यांना बाहेर पडून ओटीटी आणि मालिका कराव्याच लागतील याकडे राघवन यांनी लक्ष वेधले.
प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार राजेश दामले यांच्या संकल्पनेतून साकारात असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘एका पावसात’ या विशेष कार्यक्रमाने झाली. यामध्ये गार्गी फुले थत्ते आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांचा कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजेश दामले यांनी सुमीत राघवन यांची मुलाखत घेतली.
समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले, राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर सिद्धी कुलकर्णी यांनी आभार मानले.
