निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना नियेाजनाबाबत सूचना केल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार नागनाथ भोसले, प्रशिक्षण समन्वयक अधिकारी रवींद्र कदम, प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.
सौरभ यांनी हडपसर परिसरातील अण्णासाहेब मगर विद्यालय, पोद्दार विद्यालय तसेच साधना विद्यालयास भेट देऊन मतदान केंद्रांवरील व्यवस्थेची आणि तयारीची पाहणी केली. साधना विद्यालय स्ट्रॉंग रूमचीदेखील त्यांनी पाहणी केली. मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा देण्यात याव्यात आणि मतदार सहाय्यता केंद्राचे नियेाजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
मतदान यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण संपन्न
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने हडपसर विधानसभा मतदार संघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, समन्वयक अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख तसेच सहाय्यक अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान यंत्रे हाताळाण्यासह निवडणुकीच्या विविध कामांचे प्रशिक्षण वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात पार पडले. या प्रशिक्षणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नागनाथ भोसले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रिया व कर्मचारी अधिकारी यांना मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्यांनी पार पाडावयाची जबाबदारी आणि कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले निवडणूक कामकाज राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून पार पाडावे तसेच निवडणूक कामकाज पार पाडताना गोपनीयतेचा भंग होणार नाही व मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पडेल याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन डॉ. मोरे यांनी केले. यावेळी कामकाज पार पाडताना होणाऱ्या संभाव्य चूका व त्या कशा टाळाव्यात, निवडणूक आयोगाचे निर्देश, मतदान यंत्रे याबाबत प्रशिक्षण समन्वयक अधिकारी रवींद्र कदम व प्रदीप आव्हाड यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान यंत्रे हाताळली.
