Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

नागपूर :  मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशा भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज येथे व्यक्त केल्या.

येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात शर्मा यांनी हे विचार मांडले. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे यावेळी मंचावर उपस्थित होते.

वनामती, आत्मा आणि बिजोत्सव समुह यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती परीसरात तीन दिवसीय राष्ट्रीय बीज महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी शर्मा यांनी शेतीसाठी बियाण्यांचे महत्त्व विषद करतांना शुद्ध बियाण्यांसोबतच पाणी, हवा आणि माती हे घटक शुध्द व चिरंतण ठेवण्याचे आवाहन सद्य:स्थितीत असल्याचे सांगितले. हे आवाहन पेलण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची जबाबदारी समजून योगदान देण्याची व कृषी क्षेत्राचा उत्त्म समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. या समन्वयातून देशात ठिकठिकाणी महाबिजोत्सवाचे आयोजन होवून सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी शर्मा यांनी व्यक्त केला. त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांबाबत विस्तृत माहिती दिली.

मित्ताली सेठी म्हणाल्या की, आपल्या आवतीभवती शेतीत वेग-वेगळे संशोधन, नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनामती संस्थेसमोर आपल्या संकल्पना मांडाव्यात त्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी  संस्था पुढाकार घेईल. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतीतील नवनवीन प्रयोग व संशोधनाला सर्वदूर पोहचविणे, संशोधन व्यवस्थापन, जीआयएस, कृषी उत्पादक शेतकरी आदी घटकांना एकत्र आणून यास चळवळीचे स्वरुप देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

रविंद्र मनोहरे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना कडू यांनी प्रस्ताविक केले. बीजोत्सव समुहाच्या समन्वयक कीर्ती मंगरुळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राची माहुरकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading