Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही – सुनील तटकरे यांचा आरोप

रायगड : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आले आहे. खेड्यापाड्यातील विकास केला जातो. तेव्हा तो देश विकासाकडे जातो. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारी शक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो, असा विश्वास रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. लोकसभा मतदारसंघातील दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघात केळशी जिल्हा परिषद गटामध्ये जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

सध्या विरोधकांकडून संविधान बदलण्यावरून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली जात आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “जोपर्यंत चंद्र – सूर्य आहेत, तोपर्यंत संविधान बदलले जाणार नाही. दुषित वातावरण निर्माण करुन देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सोकॉल्ड इंडिया आघाडीकडून केले जात आहे. त्यांच्यापासून सावध व्हावे, ” असे आवाहन तटकरेंनी केले.

कुणबी समाजाची १२ कोटींची वास्तू मुंबईतील मुलुंड परिसरात उभी राहिली आहे. त्या वास्तूच्या उद्घाटनाला अनंत गीते निमंत्रण देऊनही आले नाहीत, अशी कुत्सित बुध्दी पहायला मिळाले. या अनंत गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही. अनंत गीतेंनी ३० वर्षांत काय केले हे मतदारसंघात फिरताना सांगा. मात्र अनंत गीते यांच्याकडे ३० वर्षांत केलेले काम सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते जातीचे राजकारण करत आहेत. अशी टिका देखील त्यांनी केलीय.

गेल्या पाच वर्षांत जलदगतीने कोकणात अनेक विकासकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. माझा बहुजनांसाठी काय करणार आहोत याचा रोडमॅप तयार आहे. मात्र अनंत गीते यांच्या भाषणात बूच, बाटली आणि भूत या व्यतिरिक्त काहीच नसते. ज्यांनी कित्येक वर्षे संसदेत काम केले त्यांची अशी भाषा असेल तर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? वार्‍याची जशी सुखद झुळुक येते आणि शरीराला विसावा वाटतो तशी विकासाची सुखद झुळुक तुमच्या मतदारसंघात आल्याशिवाय राहणार नाही. असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading