Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

कुटुंबियांचा पाठींबा अन्‌‍ स्वत:वर विश्वास हीच यशस्वीतेची गुरुकिल्ली : महेश कोठारे

पुणे : यश-अपयश, पुन्हा यश, पुन्हा अपयश असे आयुष्यात खूप चढ-उतार अनुभवले. परंतु कुटुंबियांचा भक्कम पाठींबा आणि आनंदाने भरभरून जगण्याची इच्छा; आलेल्या अपयशालाही आनंदाने सामोरे जाण्यची वृत्ती तसेच स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जायचे हेच ध्येय उराशी बाळगून जीवनात वाटचाल करीत राहिलो हीच माझ्या आयुष्यातील यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केले. लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा अत्यंत आवडता अभिनेता होता. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे याला रिक्रिएट करायची खूप इच्छा असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे, असेही त्यांनी आवजूर्न सांगितले.

‌‘भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवाचा गुरुवारी (दि. 25) समारोप झाला. समारोप सोहळ्यात मेहता पब्लिशिंग हाऊस आणि स्टोरी टेलतर्फे ‌‘डॅम इट आणि बरंच काही’ अंतर्गत महेश कोठारे आणि लेखक मंदार जोशी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. भावार्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे 11 बालसाहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात आले. संवाद पुणेचे सुनील महाजन, निलिमा कोठारे, मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता आदी उपस्थित होते.

ज्या काळात मराठी चित्रपट फक्त कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंध आणि तमाशाप्रधान विषयांमध्ये अडकला होता, त्या काळात मी विनोदी चित्रपटांची निर्मिती केली. यात मुख्यत्वेकरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, असे सांगून कोठारे म्हणाले, त्यातूनच माझ्या चित्रपटांना मोठे यश मिळाले. यश कसे पचवावे हे अपयश शिकविते, असे सांगून महेश कोठारे यांनी वडिल म्हणत असत की, अपयश नव्हे तर किरकोळ ध्येय ठवणे हा गुन्हा आहे याची कायम आठवण ठेवली. दोन हशांमध्ये जास्त अंतर नको हा दादा कोंडके यांनी दिलेला गुरुमंत्र आपण आत्मसात केल्याचे त्यांनी आवजूर्न सांगितले. माझे चित्रपट लहान मुलांनीच हिट केले. तात्या विंचू हे आयकॉनिक कॅरेक्टर चित्रपटात वापरावे यामागे मराठी सिनेमा तांत्रिक बाबतीत समृद्ध करावा अशी मनिषा होती. दिलीप प्रभावळकर हे माझा आवडता अभिनेता असून ते प्रत्येक भूमिका वठविताना अभ्यासपूर्ण निरिक्षणे नोंदवत अभिनय करतात, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गाजलेल्या चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण शीर्षके, पालकांनी केलेले संस्कार, यश-अपयशाची आंदोलने, अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करताना केलेले अविरत प्रयत्न, मराठी चित्रपटाला दाखविलेले वेगळी वाट अशा अनेक विषयांवर कोठारे यांनी भाष्य केले. ‌‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्राच्या ऑडियो बुक मधील मजकूर माझ्याच आवजातील आहे. स्वत:चे आत्मचरित्र स्वत: वाचणे हा अभिनव प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

‌‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकात फक्त महेश कोठारे यांचा जीवनप्रवास साकारलेला नसून त्यांचे इतर कलाकारांशी जडलेले नाते, त्यांनी अनुभवलेले यश-अपयश, चित्रपट निर्मितीत त्यांनी जपलेले वेगळेपण हा प्रवास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरावा अशी पुस्तकाची मांडणी केली आहे.

अखिल मेहता यांनी भावार्थच्या उपक्रमांची कौतुक करून पुस्तक विक्रेते म्हणून त्यांचा अभिमान वाटतो, असे सांगितले. स्टोरी टेलने महेश कोठारे यांच्या ‌‘डॅम इट आणि बरंच काही’ या आत्मचरित्राचे ऑडिओ बुकचे प्रकाशन सिटी प्राईड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा मयेकर यांनी केले तर स्वागत प्रसाद मिरासदार यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading