Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे : महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘कै. कॅप्टन शिवरामपंत व्हि. दामले करंडक’ १२ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सातारा रस्ता येथील टेंभेकर फार्म्स आणि सिंहगड रस्ता येथील कोद्रे फार्म्स येथे झालेल्या सामन्यात राज डिके याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने मिलेनीयम नॅशनल स्कूलचा १३२ धावांनी धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १६४ धावांचे आव्हान उभे केले. विदीत रायकर (४१ धावा), अंश चव्हाण (२८ धावा), संम्यक सोनावणे (२३ धावा) आणि मृण्मयी गणवीर (२० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर मिलेनीयम नॅशनल स्कूलचा डाव ३२ धावांवर कोसळला. राज डिके याने ७ धावात ३ गडी टिपले. विवान डांगट याने दोन गडी बाद करून योग्य साथ दिली.

श्रीतेज काळे याच्या चमकरदा गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबला १९.२ षटकात केवळ ८१ धावा जमविता आल्या. अमेय घोडके याने २५ धावांची खेळी केली. रीवान रांगणेकर याने ३ गडी बाद केले तर, श्रीतेज काळे याने २ तंबुत पाठवले. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने हे आव्हान १०.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. अर्वयान शहा याने २७ धावांची तर, समरसिंह जाधव याने २५ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.

याआधी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह श्री. रोहन दामले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक विक्रम देशमुख यांच्यासह सहभागी संघातील प्रशिक्षक, खेळाडू आणि पालक आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील गटात क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब, अगस्त्य क्रिकेट क्लब, कोद्रे फार्म्स क्रिकेट क्लब, २२ यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, टेंभेकर फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी,  साई क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सनराईज क्रिकेट अ‍ॅकॅडमी असे १६ संघ सहभागी झाले आहेत.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १६४ धावा (विदीत रायकर ४१, अंश चव्हाण २८, संम्यक सोनावणे २३, मृण्मयी गणवीर २०, अनय जोशी २-२८) वि.वि. मिलेनीयम नॅशनल स्कूलः ८.४ षटकात १० गडी बाद ३२ धावा (स्वप्निल हमदापुरे १०, राज डिके ३-७, विवान डांगट २-४); सामनावीरः राज डिके;

स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः १९.२ षटकात १० गडी बाद ८१ धावा (अमेय घोडके २५, रीवान रांगणेकर ३-१६, श्रीतेज काळे २-७) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १०.२ षटकात ४ गडी बाद ८२ धावा (अर्वयान शहा २७, समरसिंह जाधव २५, भावेश शिरवी २-११); सामनावीरः श्रीतेज काळे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading