‘गुलाबगंध’मध्ये प्रेमाच्या सच्च्या अनुभूतीचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : ‘प्रेम ही अतिशय तरल, नाजूक आणि व्यापक भावना आहे. या प्रेमभावनेच्या सच्च्या अनुभूतीचे दर्शन कवी सुरेश वाकचौरे यांच्या गुलाबगंध या संग्रहातील कवितांमधून घडते’, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
कवी डॉ. सुरेश वाकचौरे यांच्या ‘गुलाबगंध’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. केशव देशमुख, समीक्षक श्रीकांत चौगुले, दादाभाऊ गावडे, वंदना वाकचौरे आदी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘डॉ. वाकचौरे यांच्या वृत्तीमध्ये कलंदर आणि बिलंदर यांचे मिश्रण आहे. त्यांची प्रेमकल्पना भव्य-दिव्य आहे. प्रामाणिकपणा, बेधडकपणा यांचे दर्शनही त्यांच्या कवितेत घडते. त्यांची शैली प्रतिमायुक्त आणि सुंदर आहे. त्यांचे प्रेम तात्पुरते नाही, ते वरवरचे नाही. त्यांच्या कवितेत शृंगार आहे; पण अश्लिलता नाही. या कवीला प्रेमाचा छंद जडला आहे. त्यांची अभिव्यक्तीही छंदोबद्ध, अनुप्रासाची, लयबद्ध आहे. पूर्वायुष्यातील उनाड छंदाची कबुलीही कवी येथे देतो, हे महत्त्वाचे आहे. प्रेमाप्रमाणेच विरह भावही यात आहे. सुखात्म आणि शोकात्म या द्वंद्वाची उत्तरे शोधण्याचे आव्हान कवीने स्वीकारले आहे. कवीला केवळ प्रेयसीचे तसेच शारीर प्रेम अभिप्रेत नाही. एका टप्प्यावर हे प्रेम व्यापक होते. अलीकडे समाजात दिसणाऱ्या एकतर्फी, विद्रुप, विकृत घटनांविषयी कविता भाष्यही करते,’.
मनोगत मांडताना भावनावश झालेल्या डॉ. वाकचौरे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी सहवासाचा उल्लेख केला. पत्नी वंदना वाकचौरे यांनी दिलेल्या अखंड समंजस साथीमुळेच हे शक्य झाले. आज पत्नीच्या वाढदिवशी या प्रेमकवितांचे प्रकाशन होत आहे, हा योग अपूर्व आहे. प्रसिद्धीसाठी कधीच लेखन केले नसल्याने पूर्वी लिहिलेल्या कवितांचा संग्रह अनेक वर्षांनी प्रकाशित करत असल्याचेही ते म्हणाले.
श्रीकांत चौगुले यांनी कवी वाकचौरे यांच्या अंतरीचा भाव आणि जिव्हाळा प्रेमरूप घेऊन कवितांमधून प्रकट झाल्याचे मत व्यक्त केले. गुलाबगंध हे शीर्षकही अन्वर्थक असल्याचे ते म्हणाले. डॉ. केशव देशमुख आणि दादाभाऊ गावडे यांनीही गुलाबगंध कवितासंग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये सोदाहरण उलगडली. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
