Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

‘भावार्थ’, संवाद पुणेतर्फे बालसाहित्य महोत्सवाचे आयोजन


पुणे : पुस्तक वाचन चळवळ राबविणाऱ्या ‌‘भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत पुण्यात पहिल्या बालसाहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गप्पा-गोष्टी, हसत खेळत विज्ञानाची ओळख, मुलांचे भावविश्व खुलविणाऱ्या स्वरचित कवितांचे सादरीकरण असे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम महोत्सवात होणार असल्याची माहिती ‌‘भावार्थ’च्या कीर्ती जोशी व सल्लागार प्रसाद मिरासदार आणि संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संस्कारक्षम वयातील मुलांच्या हाती विविध विषयांवरील पुस्तके यावीत, त्यांनी ती वाचावित आणि आपले भावविश्व समृद्ध करावे हा या महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू आहे.
बालसाहित्य महोत्सवात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक मुलास एनबीटीतर्फे पुस्तक भेट देण्यात येणार असल्याचे नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी जाहीर केले आहे. महोत्सवस्थळी बालसाहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
बालसाहित्य महोत्सव दररोज सायंकाळी साडेपाच ते सात या वेळात ‌‘भावार्थ साहित्य दालन’, सक्सेस स्क्वेअर, कर्वेपुतळ्याजवळ, कोथरूड येथे होणार आहे. गुरुवार, दि. 18 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बाललेखक साची भांड, पालवी मालुंजकर व आराध्या नंदकर यांच्या हस्ते होणार आहे.
साची भांड ही संभाजीनगर येथील नाथ व्हॅली शाळेत इ. पाचवीत शिकत असून तिला गोष्टी सांगण्याची व लिहिण्याची आवड बालपणापासूनच आहे. लेखनाबरोबरच साची हिला नृत्य, नाट्य, खेळ, पोहणे, चित्रकला, वक्तृत्व व हस्तकलेची देखील आवड आहे. तिने लिहिलेल्या ‌‘साचीच्या गोष्टी’ पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे. नाशिकच्या पल्लवी मालुंजकर हिने नुकतीच दहावीची परिक्षा दिली असून ती सहावीत असल्यापासून ब्लॉग लिहित आहे. तसेच तिला वयाच्या दहाव्या वर्षापासून लेखनाची आवड आहे. गंभीर जागतिक समस्यांवरही ती तिचे विचार मांडत आहे. आराध्या नंदकर ही पुण्यातील जी. के. गुरूकुल शाळेमध्ये इ. पाचवीत शिकत असून उत्तम कल्पनाशक्तीच्या आधारे तिने ‌‘सारा पार्कर ॲण्ड मॅजिकल ऑर्ब’ हे पुस्तक लिहिले आहे. लेखनासह तिला कराटे या क्रीडा प्रकारात गती असून तिने सिनिअर ब्राऊन बेल्ट देखील मिळविला आहे. लेखन, चित्रकला आणि ट्रेकिंगमध्ये तिला रुची आहे.
शुक्रवार, दि. 19 रोजी साधना प्रकाशनतर्फे ‌‘श्यामची आई’ चित्रपटातील गौरी देशपांडे (आई) आणि शर्व गाडगीळ (श्याम) यांच्याशी गप्पा-गोष्टींचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शनिवार, दि. 20 रोजी मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‌‘हसत खेळत विज्ञान’ या कार्यक्रमात विनय र. र. आणि राजीव तांबे यांचा सहभाग असणार आहे. ज्योत्स्ना प्रकाशनतर्फे रविवार, दि. 21 रोजी चित्रकथा (पिक्चर बुक) बनते कशी या विषयावर प्रात्यक्षिकांसह चित्रकार प्रियाळ मोटे माहिती देणार आहेत. ‌‘लहान मुलांशी बोलावे कसे’ या विषयावर स्वनिल फांऊडेशनतर्फे सोमवार, दि. 22 रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यात स्मिता पाटील आणि सोनाली दिवाकर यांचा सहभाग असणार आहे. मंगळवार, दि. 23 रोजी संवादतर्फे ‌‘कविता कशी जन्म घेते’ हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला असून यात कवयत्री हेमा लेले, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका संगीता बर्वे यांचा सहभाग असणार आहे. बुधवार, दि. 24 रोजी भावार्थ शब्दमंच या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाची सांगता गुरुवार, दि. 25 एप्रिल रोजी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि स्टोरी टेलतर्फे ‌‘डॅम इट आणि बरंच काही’ अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते महेश कोठारे आणि लेखक मंदार जोशी यांच्या मुलाखतीने होणार आहे. समारोप समारंभात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे एकाच वेळी 11 बालसाहित्यकृतींचे प्रकाशन करण्यात येणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी भावार्थ : 9209076117 या क्रमांकावर संपर्क साधावा. महोत्सवात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होऊन वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन आयोजक प्रसाद मिरासदार आणि सुनील महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading