fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रमातून पुणेकरांनी अनुभवले शिवकालीन युग

पुणे : ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’… ‘सरणार कधी रण’… ‘इन्द्र जिमि जंभ पर’…’म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी अंगावर शहारे आणणारी गाणी आणि शिवकालीन युगाची माहिती देत स्वातंत्र्यसमराचा धगधगता अग्निकुंड ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमात पुणेकरांसमोर सादर करण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात आयोजित संगीत महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पं.हृदयनाथ मंगेशकर यांचा शिवकल्याण राजा हा कार्यक्रम झाला.

पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचा अंगावर शहारे आणणारा इतिहास प्रतिभावंत कवींच्या लेखणीतून आणि सुरेल आवाजाच्या साथीने रसिकांनी ऐकला. समर्थ रामदास यांचे काव्य ‘प्राणिमात्र झाले दुःखी पाहता कोणी नाही सुखी’.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले स्फूर्तीगीत ‘जयदेव जयदेव जय शिवराया’.. ‘निजरे निज शिवराया’ हे अंगाई गीत सादर करीत शिवचरित्र सांगण्यात आले.

संगीत महोत्सवाचा प्रारंभ प्रख्यात कलाकार महेश काळे यांच्या महेश काळे लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाने झाला. त्यानंतर गणेश चंदनशिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम, प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचे गीतरामायण, गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह ईन कॉन्सर्ट कार्यक्रम आणि महोत्सवाचा समारोप पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमाने झाला. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading