सर्वधर्मीय नागरिकांच्या अभिवादनामुळे भीम जयंतीचा विस्तार झाला : राहुल डंबाळे
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या आनंदामध्ये पुणे शहरातील विविध भागांमध्ये साजरी करण्यात आली. विशेषता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काल रात्रीपासूनच नागरिकांची झुंबड उडाली होती मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुरुष व कार्यकर्ते यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यंदाच्या वर्षी साधारणपणे तीन लाख अनुयायांनी अभिवादन केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुणे शहरांमधील सर्वपक्षीय तसेच सर्व धर्माच्या नागरिकांनी अभिवादन केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे जाणवले आहे. ही बाब सामाजिक सलोख्यासाठी स्वागतारह असून महापुरुष हे जाती धर्माच्या भिंतीत अडकू शकत नाहीत हा विचार यंदाच्या जयंतीतून बाहेर आला आहे. असे प्रतिपादन भीम जयंती मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला आलेल्या विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींचे स्वागत यावेळी समितीच्या वतीने करण्यात येत होते , तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत देखील समितीचे समन्वयक कार्यरत होते.
भीम जयंती निमित्त आदर्श भीमजयंती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आज सुमारे 200 पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग नोंदवलेला आहे. परीक्षणासाठी गेलेल्या प्रतिनिधी मंडळांनी या सर्व मंडळांना भेटी दिल्या असून त्यांनी तयार केलेले देखावे , सजावट , प्रबोधनपर कार्यक्रम , लोकपयोगी उपक्रम , तसेच सध्या सुरू असलेल्या मिरवणुका यांबाबतचे नोंदी घेऊन त्यांचा अहवाल तयार केलेला आहे. लवकरच याबाबतची निर्णय जाहीर करून संबंधितांना बक्षीस वाटप देखील केली जाणार आहे. पहिल्याच वर्षी 200 मंडळांनी सहभाग दर्शवल्यामुळे समितीचा उत्साह वाढला असून पुढील वर्षी अधिक तयारीनिशी ही स्पर्धा राबवली जाईल असे देखील डंबाळे यांनी सांगितले.
समितीचे कार्याध्यक्ष शैलेंद्र मोरे , मार्गदर्शिका सुवर्णा डंबाळे , उत्सव प्रमुख नागेश भोसले , उपाध्यक्ष संजय आल्हाट , कार्यकारणी सदस्य जुबेर मेमन , प्रतीक डंबाळे , चेन्नय्या रामगिरी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त , पुणे जिल्हाधिकारी , तसेच पोलीस उपायुक्त यांचे सह विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचे स्वागत केले.
नागरीकांना स्पिकरच्या भिंतींचा त्रास
पुतळा परिसरामध्ये विविध संघटनांकडून उभारण्यात आलेल्या स्पीकरच्या भिंतींचा तसेच त्यातून येत असलेल्या मोठ्या आवाजाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी शेकडो नागरिकांनी केल्या असून याची गंभीर दखल घेऊन पुढील काळात पुतळा परिसर स्पीकर मुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलणे आवश्यक असल्याचे मत यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान अनुयायांसाठी पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुविधा चांगल्या पुरविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे त्याच वेळी पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी देखील संपूर्ण टीम समवेत अत्यंत चांगला बंदोबस्त करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होण्यासाठी योग्य प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान पुणे जिल्हाधिकारी यांनी 14 एप्रिल रोजी ड्राय डे घोषित केला होता व त्याची आज अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन जयंती मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा यामुळे निर्माण झाला नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे देखील समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले व या पुढील काळात सुद्धा दरवर्षी 14 एप्रिल रोजी ड्रायडे घोषित करण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत अशी विनंती सुवर्णा डंबाळे यांनी केली.
