महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोमात महायुती कोमात – हेमंत पाटील
पुणे : संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस हे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आले. मात्र तरी देखील सत्तेसाठी नेत्यांचे होत असलेले पक्षांतर आणि पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा भाजपवर भरवसा राहिलेला नाही. अन् म्हणूनच येणारी निवडणूक ही भाजपला जिंकणे अवघड जाणार असून यावेळी जनता महायुती ऐवजी महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल देईल, असा दावा इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.
हेमंत पाटील म्हणाले, प्रादेशिक पक्ष फोडल्या शिवाय आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही हे भारतीय जनता पक्ष जाणून होता. अन् म्हणूनच त्यांनी राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस हे मोठे प्रादेशिक पक्ष फोडले. बापापासून मुलाला तोडलं. त्यामुळे सहाजिकच जनतेमध्ये बापाविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. अन् या लोकसभा निवडणुकीत जनता बापालाच म्हणजे महाविकास आघाडीलाच मतदान करणार असून या भावनेच्या लाटेत महाविकास आघाडी 22 ते 23 जागेवर निवडून येईल. भाजपला 12 किंवा 13 जागा मिळतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 तसेच शिंदे गटाची 1 जागा निवडून येण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, आताची निवडणूक ही पैश्यांवर चालणारी आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा त्याचा प्रचार मोठा. मात्र, केवळ प्रचार पाहून नागरिक मतदान करीत नाही, तर उमेदवाराच काम आणि वृत्ती पाहून मतं दिली जातात. मागील काळात भाजपने चालवलेल्या पक्ष फोडीच्या रणनित्या आणि नेत्यांनी सत्तेसाठी केलेले पक्षांतर, हे जनतेला न् पटण्यासारखे आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोमात महायुती कोमात असे चित्र दिसल्या शिवाय राहणार नाही.