Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भूताच्या शोधात ‘ते’ रात्रभर राहिले स्मशानात

पुणे : स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात रात्रभर भटकतात, असा अनेकांचा समाज आहे. मग ही भूतं कशी दिसतात, त्यांचे पाय खरंच उलटे असतात का?, हे जाणून घेण्यासाठी उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत लहान मोठे असे पन्नास जण शनिवारी (दि.६) रात्रभर मुक्कामी राहिले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेच्या वतीने हा धाडसी आणि आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिक स्मशानभूमीतच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले, भूतांची माहिती जाणून घेतली,  त्यांना साद ही घातली, पण भुते काही दिसली नाहीत. शेवटी इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये  रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापुर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातवाजेपासून रविवारी सकाळी सातवाजेपर्यन्त पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. यावेळी गावाचे सरपंच सचिन सातव,  शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मयूर पटारे,  निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे, अनुज भुजबळ, मनोहर पाटील, समाधान भगत, नम्रता ओव्हाळ,  राज भगत,  ज्ञानेश महाजन, संजय निकम, योगेश हुपरिकर, मंगेश चित्ते, सुरज चव्हाण, विवेक इंगोले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.
भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर
‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात.  त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading