‘विकसित भारत’ च्या उद्दिष्टांवर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीने चर्चासत्र
पुणे: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे, यांच्या वतीने ‘विकसित भारत २०४७’ च्या दूरदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने, नुकतीच ‘टेलिमेडिसिन क्षेत्राच्या भविष्यातील धोरण’ आणि निरोगी भविष्यासाठी एक आरोग्य दृष्टीकोन या विषयांवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, तोपर्यंत भारताचा विकसित देश म्हणून कायापालट घडवून आणण्यासाठीच्या दूरदर्शी योजनांवरील चर्चेत तरुणांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारने सुरू केलेला विकसित भारत २०४७ चा कार्यक्रम देशाच्या विविध क्षेत्रांमधील सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोनातून आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, “विकसित भारत: युवकांचा आवाज” आणि “अमृत काल विमर्श: विकसित भारत @ २०४७” यासारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले असून, यात विद्यापीठे आणि महाविद्यालयांसह विविध घटकांना सूचना, मते पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. प्राची साठे आणि बालरोग शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. रट्टा यांनी संवादात्मक विचारमंथन सत्राचे नेतृत्व केले. त्यांनी आरोग्यसेवेतील टेलिमेडिसिनच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. बी.एस. रट्टा यांनी टेलिमेडिसिनची गरज आणि सर्वसामान्य जनतेचे निरोगी आयुष्य वाढवण्याची क्षमता याबाबत सखोल विवेचन केले. दरम्यान, डॉ. प्राची साठे यांनी आरोग्यसेवेतील डिजिटलायझेशनच्या महत्त्वावर भर दिला आणि टेल-आयसीयू हे एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान असल्याचे अधोरेखित केले.
‘निरोगी भविष्यासाठी आरोग्यदायी दृष्टीकोन’ या विषयावर डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे क्लिनिकल इमिनेन्सचे प्राध्यापक आणि शैक्षणिक सहयोग संचालक, डॉ. ए.एल. काकराणी आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) माजी संचालक डॉ. मोहन गुप्ते यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. डॉ मोहन गुप्ते म्हणाले, “एक आरोग्य दृष्टीकोन स्वीकारून, आम्ही मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य यांच्यातील दुवा ओळखतो. सामुहिक प्रयत्नांद्वारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे, आम्ही सर्वांसाठी आरोग्यदायी भविष्याची खात्री करण्यासाठी आरोग्यविषयक आव्हाने सर्वांगीणरितीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डीन डॉ. जे.एस. भवाळकर यांनी तरुणांमध्ये दूरदृष्टीपूर्ण वैचारिकता वाढवण्यासाठी अशा सत्रांच्या महत्त्वावर भर दिला. विकसित भारत २०४७ च्या अनुषंगाने ओळखल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनांचा समावेश करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ही संस्था आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज होत असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे.
