अॅड. प्रकाश, आनंदराज आंबेडकर, महादेव जानकरांना मिळाले ‘ हे’ निवडणूक चिन्ह
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले असून रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना अमरावती लोकसभा निवडणूकीत गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे.
महाराष्ट्रात यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली असून त्यांना नवे निवडणूक चिन्हही देण्यात आले आहे. अशातच इतर छोट्या पक्षांना अद्याप निवडणुकीसाठी पक्षचिन्ह देण्यात आले नसून त्या पक्षांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. आयोगाने आज ही प्रक्रिया पूर्ण करत छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप केले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. वंचितने महाविकास आघाडीपासून वेगळे होत स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने काँग्रेसनेही अकोल्यात आपला उमेदवार दिला असून काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अकोल्यात यंदा तिरंगी सामना रंगणार आहे.
