Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल व आरटीओ यांच्या संयुक्त पथकाकडून नियम मोडणाऱ्या रिक्षांवर कारवाई

पुणे : पीएमपीएमएल ची बसस्थानके अथवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु रिक्षाचालक सदरचे नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकांचे परिसरात येवून बसप्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा लावत असल्याबाबतच्या तक्रारी परिवहन महामंडळाचे चालक, प्रवाशी व प्रवाशी मंचाकडून वारंवार प्राप्त झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणेकामी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशान्वये परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करणेत आलेले असून या पथकासमवेत सोबत प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आरटीओ) वरिष्ठ अधिकारी देखील असतात. परिवहन महामंडळाकडील ४ सेवक व १ आरटीओ अधिकारी यांचे पुणे शहरासाठी १ व पिंपरी-चिंचवड शहरासाठी १ अशी दोन संयुक्त दक्षता पथके तयार करणेत आलेली असून मागील ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई करणेत आलेली आहे. त्याची महिनेमहा माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र. महिना दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या रिक्षांची संख्या
१ जानेवारी २०२४ ५५३
२ फेब्रुवारी २०२४ ६२२
३ दि.२६ मार्च २०२४ अखेर ४४५
एकूण १६२०

तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन कडून स्वारगेट बसस्थानकाचे परिसरात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा, ओला, उबेर, लक्झरी बस इ. वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ नुसार माहे जानेवारी २०२४ ते दि. २५ मार्च २०२४ अखेर ५३० वाहनांवर कारवाई करून वाहतूकीस अडथळा या शीर्षकाखाली एकूण रक्कम रूपये ३,३२,०००/- इतका दंड आकारण्यात आलेला आहे. सबब पीएमपीएमएल च्या बसस्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खाजगी वाहने दिसल्यास सदरचे वाहनांवर आरटीओ पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असून अपघाताची शक्यता असल्याने रिक्षा व इतर खाजगी वाहनांनी बस स्थानकांचे परिसरात त्यांची वाहने उभी करू नयेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading