Lok sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार रिंगणात
मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok sabha Election 2024) जाहीर झाल्या पासून बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळें (Supriya Sule) विरोधात कोण उभे राहणार? याबाबत संसपेंन्स कायम होता. मात्र आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गट व शरद पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर झाली असून आता बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उभे राहणार यांची चर्चा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका वाढल्या अन् बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार या चर्चा होवू लागल्या. अखेर त्यावर आज राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला गेला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची समोरासमोर भेट झाली होती. तेव्हा दोघींनी ही गळाभेट घेत एकमेएकींचे स्वागत केले होते. आता सुनेत्रा पवारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर दोघी ही एकमेएकींविरोधात कसा प्रचार करणार; हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या विजय शिवतारे यांची माघार
शिवसेनेच्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील बंड करीत बारामतीत अपक्ष लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी अखेर निर्णायक ठरली आणि विजय बापू शिवतारे यांनी आज अधिकृत रित्या निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
