महायुतीच्या नवनीत राणांविरोधात बच्चू कडुंच्या ‘प्रहार’चा उमेदवार
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहारने या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार उतरवावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो, असे यांनी सांगितले.
तसेच दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. बूब यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. अमरावती मतदारसंघात २ आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असे सगळ्यांनाच वाटते असे आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटले.
दरम्यान, माझ्यासमोर २ उमेदवार आहेत ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. सरकारी पैशातून श्रेयवादाचे बॅनर्स लावणे हे मला कुणी शिकवले नाही. मी शेकडो कोटी रुपयांचे काम केले पण कुठेही माझ्या नावाचा बोर्ड लावला नाही. विकासकामे होत राहतील पण समाजासमाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे असे दिनेश बूब यांनी सांगितले
