Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

तपस्या हे कर्मयोगाचे दुसरे नाव : डॉ. सदानंद मोरे

पुणे : काही मिळण्याची शक्यता नसताना कर्मयोग्याच्या भूमिकेत राहणे ही खरी तपस्या आहे. तपस्या हे कर्मयोगाचे दुसरे नाव आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. समाजासमोर आदर्श प्रस्थापित करणारा हा पुरस्कार असून स्त्री शक्तीचा गौरव आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या तसेच कला-साहित्य-सामाजिक कार्यात लक्षणीय कर्तृत्व गाजविणाऱ्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त स्वानंदी क्रिएशन पुणेतर्फे ‌‘तपस्या पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्यक्ष आचारणात आणून समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या पंडित राम मराठे यांच्या कन्या सेवाव्रती  सुशील रघुवीर ओक आणि आईकडून मिळालेला सांगीतिक वारसा जपणाऱ्या  परिणीता प्रमोद मराठे यांचा ‘तपस्या पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. मानपत्र आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, शिस्त लावणे हेही एक प्रकारचे संगीत आहे. संगीत क्षेत्रातील व्यक्ती इतरही क्षेत्रात उत्तम कार्य करू शकतात. आईचे प्रेम व पित्याची शिस्त लावणारा खरा गुरू असतो असे गौरवोद्गार परिणीता मराठे यांच्या कार्याविषयी काढले. भारतीयत्वाची जाणीव कार्यातून घडते तेव्हा खरी एकात्मता प्रस्थापित होते, अशा शब्दात सुशील ओक यांच्याविषयी डॉ. मोरे यांनी भावना व्यक्त केल्या.
निर्मला गोगटे म्हणाल्या, मूकपणाने, श्रद्धाभावाने कार्य करत राहणे ही तपस्या असते. अशा तपस्या करणाऱ्या असंख्य स्त्रीया समाजात आहेत. जीवनात काही तरी करत रहावेसे वाटणे खूप महत्त्वाचे आहे. कलाकार स्वत:सह समाजाला आनंद देतो. परंतु आपला आनंद विसरून समाजसेवेद्वारे दुसऱ्याच्या डोळ्यात आनंद दिसावा ही भावना महान आहे.
सत्कारानंतर बोलताना सुशील ओक यांनी आपली सामाजिक क्षेत्रातील वाटचाल उपस्थितांसमोर उलगडली. त्या म्हणाल्या, दुसऱ्यासाठी काही तरी करण्याचे बाळकडू लहानपणीच मिळाले. वडिलांकडे अनेक दिग्गज कलाकार नियमित येत असत. त्यांचा सहवास आणि निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इच्छा असली की मार्ग आपोआप सापडतो या भावनेतून कार्य करीत राहिल्यामुळे उत्तरांचलमध्ये संघाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात सेवा घडली. छात्रवासाच्या माध्यमातून सेवाव्रती भावनेतून अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. तरुणांना संदेश देतांना त्या म्हणाल्या, किशोर वयापासूनच विद्यार्थ्यांनी मनाशी ध्येय निश्चित करून भविष्यातील वाटचाल करावी.
सांगीतिक प्रवास उलगडून सांगताना परिणीता मराठे म्हणाल्या, आईची इच्छा आणि आवड पूर्ण करण्याकरिता आम्ही पाचही बहिणींनी संगीत क्षेत्रात शिक्षण घेतले. पूर्णवेळ कलाकार होण्याची मानसिकता नाही हे ओळखून गांधर्व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. वेळेचे नियोजन, शिस्त, नेटकेपणा यांचे संस्कार झाल्यामुळे गांधर्व महाविद्यालयाचे कार्य उत्तमरित्या सांभाळू शकले. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालकत्वही याच भावनेतून आनंदाने स्वीकारले. घरातील कलेचा वारसा मुलगा परदेशातही पुढे नेत आहे याचा पालक म्हणून आम्ही दोघांनाही अभिमान आहे.
सुशील ओक आणि परिणीता मराठे यांच्याशी संगीतकार आशिष केसकर यांनी संवाद साधला.
पुरस्कारामागील भावना प्रास्ताविकात विशद करताना अपर्णा केळकर म्हणाल्या, पडद्यामागे राहून अबोलपणे तपस्या करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आणि माणूस असण्याचे समाजभान जपण्यासाठी 2009 पासून तपस्या पुरस्काराचे आयोजन करीत आहोत. कृतज्ञतेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत राहिली तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे फलित ठरेल. सत्काराच्या निमित्ताने संपूर्ण कुटूंब एकत्र येत असल्याने आठवणींना उजाळा मिळत असल्याचे दिसून येते.
मान्यवरांचे स्वागत अपर्णा केळकर यांनी केले. सूत्रसंचालन वंदना बोकील-कुलकर्णी यांनी तर आभार मकरंद केळकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पल्लवी पोटे आणि भाग्यश्री केसकर यांचे गायन झाले. त्यांना पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), कौशिक केळकर (तबला) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading