जेएसडब्ल्यू फाउंडेशन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि साइटसेव्हर्स इंडियाची रायगड जिल्ह्यातील अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी भागीदारी
मुंबई : जेएसडब्लू फाउंडेशन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि साईटसेव्हर्स इंडिया यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ग्रामीण नेत्र आरोग्य कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
रायगड जिल्ह्यातील सुमारे 26 लाख लोकसंख्येच्या नेत्रविषयक आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष मुदतीचा हा अनोखा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. आगामी तीन वर्षांत जिल्ह्यातील अंधत्वाचे प्रमाण 0.3% पेक्षा कमी करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. रायगडमधील लोकसंख्येला सुलभ आणि परवडणारी प्राथमिक आणि दुय्यम नेत्र सेवा सुनिश्चित करणे त्याचबरोबर डोळ्यांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मजबूत करणे ही ध्येये प्रकल्पाच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहेत.
एम्स (AIIMS) [i] द्वारे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील RAAB अभ्यासात चिंताजनक आकडेवारीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या आकडेवारीत 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 2.09% व्यक्ती अंध आहेत, तर 12.98% लोकांना दृष्टीदोष आहे. या अभ्यासापाठोपाठ करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत मूल्यांकनात 6,014 मोतीबिंदू प्रकरणांचा अनुशेष उघड झाला. या अंतर्गत मूल्यांकनाने या भागातील डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात या अनोख्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे अनेक महत्वाचे फायदे झाले आहेत. या प्रकल्पामुळे सात व्हिजन सेंटर्सची स्थापना, भव्य प्रमाणात 292 शिबिरांचे आयोजन आणि 124,360 व्यक्तींची तपासणी करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट 23,862 चष्मे प्रदान करण्याचे आहे आणि त्याद्वारे दृष्टीदोषपीडीत नागरिकांची मदतीची गरज पूर्ण केली जाणार आहे. या व्यतिरिक्त, 16,870 व्यक्तींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची योजना आहे. मोतीबिंदूच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी ही महत्त्वपूर्ण मदत ठरणार आहे. डोळ्यांची निगा राखण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सेवांची उपलब्धता आणखी उंचावण्याबरोबरच हजारो गरजू लोकांचे जीवनमान सुधारण्याबाबत या प्रकल्पाची बांधिलकी ही आकडेवारी अधोरेखित करते.
पूर्वी न राबविलेल्या भौगोलिक प्रदेशात साईटसेव्हर्स इंडियाचा ग्रामीण नेत्र आरोग्य देखभाल कार्यक्रम विस्तारित करताना या सहयोगाचा उद्देश या प्रदेशातील नेत्रविषयक आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करणे हा आहे.
जेएसडब्लू फाउंडेशन त्यांच्या आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांतर्गत, दृष्टीतील अपवर्तक त्रुटी शोधण्यात आणि योग्य क्रमांकाच्या चष्म्यांसह या त्रुटी दुरुस्त करण्यात मदत करण्यासाठी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करत आहे. तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून जनसमुदायांना मदतही करत आहे. या कार्यक्रमांतर्गत, दृष्टी तपासणी आणि सुधारणा शिबिरांव्यतिरिक्त, अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यासह सरकारी दृष्टी सुधार केंद्रे देखील स्थापन केली जाणार आहे.
आपल्या चिरस्थायी वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आपल्या ‘सीइंग इज बिलीव्हिंग’ उपक्रमाद्वारे दोन दशकांहून अधिक काळ साईटसेव्हर्स इंडियाबरोबर एक भक्कम सहयोगी म्हणून कार्यरत आहे. या भागीदारातून स्टँडर्ड चार्टर्ड बँक देशव्यापी नेत्र आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सततच्या पाठिंब्याने, साईटसेव्हर्स इंडियाने सुंदरबन आणि कोलकाता शहरातील झोपडपट्ट्यांसह विविध क्षेत्रांमध्ये नेत्र निगा सेवेची पाळेमुळे यशस्वीरित्या घट्ट केली आहेत.
“सीइंग इज बिलीव्हिंग” हा कार्यक्रम स्टँडर्ड चार्टर्डच्या सामाजिक जबाबदारी आणि जागतिक प्रभावाच्या मूळ मूल्यांना मूर्त रूप देत आहे. धोरणात्मक भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांद्वारे “सीइंग इज बिलीव्हिंग” ने 2003 पासून विविध उपक्रम राबवत जगभरातील सेवेपासून वंचित समुदायांना महत्त्वपूर्ण नेत्रसेवा प्रदान करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारतात, 500 दृष्टी केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून त्यातील 50 टक्के केंद्र महिलांकडून चालविली जात आहे. त्याचबरोबर 3 नेत्र देखभाल अकादमी स्थापन करण्यापर्यंत, या उपक्रमाने आपल्या सर्वांगीण दृष्टिकोनाने लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे आणि गरजूंच्या डोळ्यांना एक तेज आणि दृष्टीसुध्दा प्रदान केली आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस (जीबीएस) च्या भारतातील सस्टेनेबिलिटी प्रमुख करुणा भाटिया म्हणाल्या, “आम्ही निवडलेल्या भौगोलिक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या लवचिक नेत्र आरोग्य प्रणालीची तीव्र गरज ओळखली आहे. त्याचबरोबर आम्ही नागरिकांमधील अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याकरिता सर्वसमावेशक धोरणाची अत्यावश्यक गरजही ओळखतो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आलेला ग्रामीण नेत्र आरोग्य कार्यक्रम हा प्रकल्पाच्या तीन वर्षांच्या कालमर्यादेत तेथील विद्यमान अंधत्वाचा अनुशेष दूर करण्यासाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यात एक सक्षम आणि शाश्वत नेत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्दिष्टात योगदान देऊन दृष्टीदोष दूर करण्याच्या कार्यावर ठोस प्रभाव पाडण्याचे आमचे ध्येय आहे.”
जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सीईओ अश्विनी सक्सेना यावेळी भाष्य करताना म्हणाल्या, “जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या सर्वसमावेशक आरोग्य सेवांअंतर्गत नेत्रतपासणी मदत सर्वात जास्त गरज असलेल्या समुदायांना सेवा देते. आम्ही दृष्टी तपासणी शिबिरे आयोजित करतो आणि अपवर्तक त्रुटींसाठी मोफत चष्मा देतो, तसेच कायमचे अंधत्व टाळण्यासाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो. हे सहकार्य वंचित समुदायांसाठी आरोग्यसेवा सुलभतेचे क्षितिज विस्तृत करते. आमचे एकत्रित प्रयत्न, कौशल्य आणि संसाधने यांच्या सहाय्याने आम्ही आमचे प्रयत्न वाढवू शकणार आहोत आणि चांगल्या भविष्यासाठी समुदायांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळतील याचीही खात्री करू.”
साईटसेव्हर्स इंडियाचे सीईओ आर एन मोहंती म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य प्रणाली बळकटीकरण चौकट आणि राष्ट्रीय नेत्रआरोग्य योजना आणि व्हिजन 2020 देशाच्या प्राधान्यक्रमांना सतत पाठबळ देण्याच्या अनुषंगाने, आमचा हा पुढाकार सरकार, ना-नफा संस्था आणि स्थानिक नेत्र रुग्णालये यांच्या सहकार्याने डोळ्यांच्या आरोग्यविषयक देखभाल पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. आमचे सामूहिक उद्दिष्ट स्पष्ट आहे आणि ते म्हणजे टाळता येण्याजोगे अंधत्वाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे आणि सेवेपासून वंचित नागरिकांसाठी अत्यावश्यक नेत्रसेवा सेवांची उपलब्धता करुन देणे. आम्ही धोरणात्मक भागीदारी आणि आरोग्य प्रणाली बळकट करणे तसेच दर्जेदार नेत्रसेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेद्वारे कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यास तयार आहोत.”
साईटसेव्हर्स इंडियाच्या सर्वसमावेशकतेच्या निष्ठेला अनुसरून, या प्रकल्पाची मुख्य रणनीती संस्थेच्या नीतिमूल्यांना प्रतिबिंबित करते. ‘कोणालाही मागे सोडू नका’ या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) कार्यक्रमासह संरेखित करत तसेच समावेषकतेवर दृढ लक्ष केंद्रित करून हा प्रकल्प निवडलेल्या जिल्ह्यात लागू केला जाईल. लाभार्थी ओळखण्यापासून ते तपासणी आणि त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या कार्यक्रमांपर्यंत, हा उपक्रम दिव्यांग लोकांचा सक्रिय सहभाग आणि समावेश सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे, विशेषत: अपंग महिला आणि मुलींवर या उपक्रमातून भर दिला जात आहे. शिबिरे आणि नेत्र तपासणी केंद्रांद्वारे नेत्र तपासणी सेवा पुरवत किमान 50% महिलांना लाभ देण्याचे या प्रकल्पाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.
रायगड जिल्ह्यात धोरणात्मकदृष्ट्या निवडलेल्या सहा ब्लॉक्समध्ये कार्यरत असलेला, हा प्रकल्प निवडलेल्या सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासनाशी सहयोग करतो. साईटसेव्हर्स इंडिया या प्रकल्पात गुणवत्ता नियंत्रण, देखरेख, अहवाल, देणगीदारांचे अनुपालन, आर्थिक देखरेख, सरकारशी नेटवर्किंग करणे आणि एकूणच प्रणाली मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि ज्ञानरुपी सहयोगी भागीदार असेल. जागरुकता वाढवणे, निदान सुलभ करणे आणि दृष्टीदोषांवर उपचार प्रदान करणे, पुढील तीन वर्षांमध्ये उपक्रमासाठी निवडलेल्या प्रदेशात टाळता येण्याजोगे अंधत्व आणि दृष्टीदोष लक्षणीयरीत्या कमी करण्याचा प्रयत्न करणे, ही उद्दीष्टे आहेत.
रायगड जिल्ह्यातील साइटसेव्हर्स इंडिया, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि जेएसडब्लू यांचे सहकार्यात्मक प्रयत्न डोळ्यांच्या आरोग्यामध्ये शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी आणि स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामायिक जबाबदारीचे प्रतीक आहेत.
