Wednesday, November 11, 2026
Latest NewsPUNE

भारतीय तत्त्वज्ञान पूर्णत्वाकडे नेणारे आहे – प्रसिद्ध विदुषी, व्याख्यात्या धनश्री लेले यांचे प्रतिपादन

पुणे – स्त्री – पुरुष हा भेद निर्मितीसाठी आहे. चैतन्याला निर्मितीसाठी प्रकृतीची अपरिहार्य आवश्यकता असते. तिच्याशिवाय तो निर्मिती करू शकत नाही. मात्र, अखेरीस पूर्णत्वासाठीच ते एकत्र येत असतात. भारतीय तत्त्वज्ञान प्रत्येक जीवाला पूर्णत्वाकडे नेणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या, विदुषी धनश्री लेले यांनी केले. ‘रूप, गुण, नाम हे भेद वरवरचे आहेत. अंतिम तत्त्व कैवल्याचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

हिंदू महिला सभा, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी धनश्री लेले यांना विदुषी डॉ कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते ‘शब्दव्रती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, धनादेश, महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अग्निशमन दलातील पहिल्या महिला फायरमन मेघना सकपाळ यांचाही याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी धनश्री लेले यांच्याशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात धनश्री लेले यांनी आपल्या जडणघडणीविषयीचे विवेचन केले. ‘बालपणापासून आईसोबत ऐकलेली व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, व्याख्यानमाला आणि वाचनाचे वेड, यातून बोलण्याची सवय विकसित होत गेली. सुरुवात निवेदनापासून झाली. अनेक मान्यवर कलाकारांसोबत शेकडो कार्यक्रम केले. मात्र या काळात आपल्याला स्वतःला स्वतःचे काही सांगावेसे वाटते आहे, याची स्पष्ट जाणीव झाली आणि मी निवेदनाकडून व्याख्यानांकडे वळले’, असे त्या म्हणाल्या.

उत्तरार्धात लेले यांनी ‘भारतीय चिंतनात स्त्री’ या विषयावर पारदर्शिकांच्या साह्याने विवेचन केले. ‘वेदकाळापासून ते थेट विजयनगर साम्राज्याच्या अस्तापर्यंत आपल्याकडे स्त्री मुक्त होती. तिला अध्ययनाचा, क्रीडानैपुण्याचा, अध्यापनाचा, राज्यकारभाराचा असे सर्व अधिकार होते. स्वतःचा जोडीदार निवडण्याचीही मोकळीक तिला होती. मात्र, क्रूर आक्रमकांमुळे १० व्या शतकानंतर स्त्रिया सुरक्षेच्या कारणास्तव घरात कोंडल्या गेल्या’, असे सांगून लेले म्हणाल्या, “भारतीय तत्त्वविचारात सांगितलेली महावाक्ये आपल्याला पूर्णत्वाकडे नेणारी दिशा देतात. जिथे पूर्णत्व आहे, तिथे स्त्री – पुरुष असे भेद संभवत नाहीत. जेव्हा निर्मितीचा प्रश्न येतो, तेव्हा मूळ केवलतत्त्व स्वतःमधूनच शक्ती उत्पन्न करते, ज्याला आपली परंपरा शिव– शक्ती, पुरुष – प्रकृती असे म्हणते. निसर्गातही आपल्याला निर्मितीचा अनंत रूपे आढळतात. मात्र, निसर्गचक्रही अखेरीस पूर्णत्वाकडेच नेते.”

कल्याणी नामजोशी म्हणाल्या, “सनातन धर्मावर योग्य अभ्यास न करता टीका करणे योग्य नाही. कुटुंबव्यवस्था हा आपल्या सनातन धर्माचा पाया आहे. जागतिक स्तरावर ती आपली ओळख आहे. मात्र, अलीकडे घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता, परिस्थिती चिंताजनक आहे. युवा पिढीने या प्रक्रियेतील आपली जबाबदारी ओळखून आचरण केले पाहिजे. हिंदू महिला सभेच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य घडत आहे, ही सकारात्मक बाब आहे”, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदू महिला सभेच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य फीत दाखवण्यात आली. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply