‘इतिहास प्रेमी’ घडविणा-या शिक्षकाला रमणबागेत अनोखी ‘गुरुवंदना’
पुणे : मानाची पालखी, फुलांची उधळण आणि मिरवणूक असे दृश्य आपण सण-उत्सवांना पाहतो. मात्र, पुण्यातील रमणबाग शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक मोहन शेटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाची चक्क पालखीतून मिरवणूक काढली. फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह अशा वातावरणात हा आगळावेगळा सोहळा पार पडला.
रमणबागीय परिवार तर्फे प्रशालेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी ख-या अर्थाने इतिहास प्रेमी घडविणा-या मोहन शेटे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्र.के.घाणेकर, मोहन शेटे, गौरी शेटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मोहन शेटे यांना सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची मूर्ती, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
डॉ. गो.बं. देगलूरकर म्हणाले, आयुष्याला आपल्या कार्यातून अर्थ प्राप्त करुन देणे गरजेचे असते, ते शेटे सरांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्यातून करुन दाखविले आहे. रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना पालखीचा मान दिला, ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आपुलकी व प्रोत्साहन देऊन विद्यार्थी घडवावे लागतात. आपल्या शिकविण्याच्या कौशल्यातून आणि वाणीतून इतिहास हजारो विद्यार्थ्यांसमोर उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र.के.घाणेकर म्हणाले, मोहन शेटे हे इतिहास शिकविण्यासोबतच इतिहास घडविणारे शिक्षक आहेत. पुणे शहरात सुरु झालेल्या वारसा सहलींमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या व्याख्यानांतून मोहन शेटे यांनी सर्वांपर्यंत इतिहास पोहोचविण्यासोबत लेखन देखील करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोहन शेटे म्हणाले, विद्यार्थ्यांचे प्रेम ही शिक्षकाची श्रीमंती असते. अनेकदा विद्यार्थ्यांमुळे शिक्षक घडत असतो. मी देखील रमणबागेचा विद्यार्थी असल्याने माझ्यावर देखील इथलेच संस्कार झाले आहेत. चांगले संस्कार करणारे शिक्षक मला मिळाले, हे माझे भाग्य आहे. पुस्तक आणि विद्यार्थी ही दोन प्रकारची ग्रंथालये शाळेमध्ये असतात. मी पुस्तकांप्रमाणे विद्यार्थ्यांची मने देखील वाचत गेलो, त्यामुळे मला श्रीमंत आणि संपन्न होता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माजी विद्यार्थ्यांनी देखील मोहन शेटे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी दाखवण्यात आलेल्या चित्रफीतीत पांडुरंग बलकवडे, राहूल सोलापूरकर, गिरीश कुलकर्णी, चिंतामणी चितळे, भूषण हर्षे इत्यादींनी शेटे सरांचे विविध पैलू उलगडून दाखवले. अॅड.अभिजीत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
