Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम दिला

ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांचे गौरवोद्गार

पुणे  : जेव्हा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर गायच्या तेव्हा हजारो कोकिळा गातायेत असा भास व्हायचा. त्यांच्या गाण्यात रागांची शुद्धता होती. त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम दिला असे गौरवोद्गार ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांनी काढले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या गानसरस्वती महोत्सवात ते बोलत होते. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालेल्या यावर्षीच्या दहाव्या गानसरस्वती महोत्सवात पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांचा सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता यावर्षीचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला. रोख रुपये ५१ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी ‘म्हारो प्रणाम…’ चे बोल गुणगुणत उपस्थितांचे नमस्कार स्वीकारले यावेळी बोलताना ते म्हणाले, “किशोरीताई यांचे गाणे म्हणजे एखादा बगीचा फुलल्याची, बहार आल्याची जणू जाणीव होती. त्यांच्या गायकीत एक चमक होती. असे कलाकार मोजकेच होतात आणि किशोरीताई या त्यांपैकी एक होत्या. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला त्यांनी नवा आयाम दिलाच यासोबत या घराण्याची गायकी, चीजा त्यांच्या गायकीतून पुढच्या पिढीला मिळत गेल्या.”

“खरेतर गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा एका गायकाला मिळायला हवा. मात्र यासाठी माझी निवड करण्यात आली म्हणून मी महोत्सवाचा आभारी आहे. आज मी खूप खूष आहे कारण ज्यांना आम्ही लहानपणापासून पूजत आलो, ऐकत आलो त्यांच्या नावाने असलेल्या महोत्सवात हा सन्मान मला प्रदान होत आहे, तोही त्यांच्या आईंच्या नावाने ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.”

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी यावेळी स्वतः तयार केलेल्या मोहनवीणेवर स्वतः रचलेला राग विश्वरंजनी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड -आलापचे दमदार सादरीकरण केले. यावेळी त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सलील भट्ट यांनी सात्विकवीणेवर सहवादन केले. पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहनवीणा वादन आणि पंडीत सलील भट्ट यांचे सात्विकवीणा वादन यांनी उपस्थितांना एकाच वेळी सप्तकात अनेक वीणा वाजत असल्याचा अनुभव दिला. ग्रॅमी पुरस्कार विजेती रचना सादर करीत या दोघांनी आपल्या वादनाचा समारोप केला. पंडित विश्व मोहन भट्ट आणि पंडीत सलील भट्ट यांना तबल्यावर अभिषेक मिश्रा यांनी समर्पक साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading