Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायनाने १० व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप

पुणे: गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायकीने १० व्या गानसरस्वती महोत्सवाचा आज समारोप झाला.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी दहावा गानसरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला आज नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, धवल किर्लोस्कर, मृगा किर्लोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

पंडित रघुनंदन पणशीकर यांनी जयपूर घराण्याचा पारंपरिक राग असलेल्या सावनी नट या रागाने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी जयपूर घराण्याच्या पारंपरिक विलंबित आणि द्रुत बंदिशी सादर केल्या. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा राघवेंद्र स्वामी यांवरील अभंग सादर करीत त्यांनी समारोप केला.

रघुनंदन पणशीकर यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, राधिका जोशी, शुभम खंडाळकर, विनय रामदासी, केदार जोशी, श्रीनिधी देशपांडे व ओंकार आलम यांनी तानपुरा साथसंगत केली.

या आधी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्व मोहन भट्ट यांना बिभास आणि निहार आमोणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार दिला जातो. रोख रुपये ५१ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्काराला उत्तर देताना पंडित विश्व मोहन भट्ट  म्हणाले, “खरेतर गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा एका गायकाला मिळायला हवा. मात्र यासाठी माझी निवड करण्यात आली म्हणून मी महोत्सवाचा आभारी आहे. आज मी खूप खूष आहे कारण ज्यांना आम्ही लहानपणापासून पूजत आलो, ऐकत आलो त्यांच्या नावाच्या महोत्सवात हा सन्मान मला प्रदान होत आहे तोही त्यांच्या आईंच्या नावाने ही मोठी बाब आहे.”

जेव्हा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर गायच्या तेव्हा हजारो कोकिळा गातायेत असा भास व्हायचा. त्यांच्या गाण्यात रागाची शुद्धता होती. त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीला नवा आयाम तर दिलाच यासोबत या घराण्याची गायकी, चीजा त्यांच्या गायकीतून पुढच्या पिढीला मिळत गेल्या. त्यांचे गाणे म्हणजे एखादा बगीचा फुलल्याची, बहार आल्याची जणू जाणीव होती. त्यांच्या गायकीत एक चमक होती. असे कलाकार मोजकेच होतात आणि किशोरीताई या त्यांपैकी एक होत्या, अशा भावना पंडित भट्ट यांनी व्यक्त केल्या.

यावेळी पंडित विश्व मोहन भट्ट यांनी ‘म्हारो प्रणाम…’ चे बोल गुणगुणत उपस्थितांचे नमस्कार स्वीकारले.

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी यावेळी स्वतः तयार केलेल्या मोहनवीणेवर स्वतः रचलेला राग विश्वरंजनी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड -आलापचे दमदार सादरीकरण केले. यावेळी त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सलील भट्ट यांनी सात्विकवीणेवर सहवादन केले.

पंडित विश्व मोहन भट्ट यांनी स्वतः मोहनवीणा आणि सात्विकवीणा यांची निर्मिती केली असून आज त्यांनी स्वतः पुणेकर रसिकांसमोर त्याचे केलेले सादरीकरण पुणेकरांना वेगळीच अनुभूती देणारे ठरले.

पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहनवीणा वादन आणि पंडीत सलील भट्ट यांचे सात्विकवीणा वादन यांनी उपस्थितांना एकाच वेळी सप्तकात अनेक वीणा वाजत असल्याचा अनुभव दिला. ग्रॅमी पुरस्कार विजेती रचना सादर करीत या दोघांनी आपल्या वादनाचा समारोप केला.

पंडित विश्व मोहन भट्ट आणि पंडीत सलील भट्ट यांना तबल्यावर अभिषेक मिश्रा यांनी समर्पक साथ केली. मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading