श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ३५० विद्यार्थ्यांच्या पंखांना सामर्थ्याचे बळ
पुणे : ज्ञानाशिवाय मनुष्य नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे ज्या गरजू विद्यार्थ्यांचे वर्तन चांगले आहे, अशा पुण्यातील ७ शाळांतील ३५० विद्यार्थ्यांच्या पंखांना श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे सामर्थ्याचे बळ देण्यात आले. संपूर्ण वर्षभराचा शैक्षणिक खर्च शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देत भारताचे चांगले नागरिक घडविण्याच्या प्रवासाकडे वाटचाल करण्याकरिता मंदिराने विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘ब्रह्मोत्सवात’ पुण्यातील ७ शाळांमधील ३५० गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा, योजनेचे समन्वयक नितीन पत्की यांसह शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
हुजूरपागा प्रशालेच्या पर्यवेक्षिका सुधा कांबळे म्हणाल्या, धार्मिक कार्यासोबतच शिक्षणाच्या कार्यात सुरु असलेला शिष्यवृत्ती हा उपक्रम आहे, तो स्पृहणीय आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ तर मिळतेच त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सद््गुणांचे संवर्धन करण्यासाठी देखील मदत करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मबळ मिळत असून आत्मभान देखील येत आहे.
विद्यार्थीनी स्वतिश्री काळे म्हणाली, माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र, या शिष्यवृत्तीमुळे मला मोठी मदत मिळत आहे. माझ्यातील चांगले गुण आणि वर्तनामुळे या शिष्यवृत्तीकरिता माझी निवड झाली, याचा मला आनंद आहे. मोठे झाल्यावर मी देखील अशीच मदत गरजूंना करीन.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवकाळात धार्मिक विधींबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही मंदिरातर्फे राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मागील १० वर्षांपासून दिली जाते. यंदा हुजूरपागा मुलींची शाळा लक्ष्मी रस्ता, रेणुका स्वरुप मुलींची शाळा सदाशिव पेठ, विद्या विकास विद्यालय सहकारनगर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
भरत अग्रवाल म्हणाले, दैनंदिन जीवनात व्यवहारी ज्ञानासोबतच शालेय शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे. शालेय शिक्षण हा व्यक्तिमत्व घडविण्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढेही हा उपक्रम सातत्याने सुरु राहिल.
