चुकीच्या माहितीचा लोकशाहीला धोका : प्रशांत कदम
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मान
पुणे – चुकीच्या माहितीचा धोका लोकशाहीला सर्वात जास्त असून त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडतय, ते माध्यमांनी वेळीच ओळखले पाहिजे. असे मत तरुण पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रशांत कदम यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या दर्पण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी चे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार उपस्थित होते.
कदम म्हणाले, दृष्य श्राव्य माध्यमांच्या या काळात मुद्रित माध्यमांमधील प्रत्येक शब्दाला प्रतिष्ठा आहे. मात्र हे शब्द चमकदार करण्याच्या नादात बातमीतील मूल्य हरवता कामा नये. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात जगातील १८० देशामध्ये भारताचा नंबर १६० वा आहे.
आजकाल राजकीय नेत्यांची माध्यमातून येणारी विधाने ही महाराष्ट्राला शोभणारी नाहीत समाजाने देखील आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे असल्याचे मत अरुण खोरे यांनी व्यक्त केला.
प्रा. जोशी म्हणाले, पत्रकारितेच्या खिडकीतून सामान्य माणूस भोवतालाकडे पाहत असतो. राजकारणापलीकडे समाजजीवनातही खूप काही चांगले घडते आहे, त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. राजकारणातील भाषेचा खालावणारा स्तर असभ्य राजकीय संस्कृतीचा निदर्शक आहे. समाजमानस खालावणे समाजहिताचे नाही.
रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमर शेंडे यांनी केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.
