Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

शिवजन्मोत्सव सोहळ्यात साजरा झाला ‘पाळणा बाळ शिवरायांचा’

पुणे : पहिल्या दिवशी राज दरबारी, आला वंशाला असाखे तरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो…पासून ते बाराव्या दिवशी बोलवा माळी, केली आरस लावून केळी, नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो… असे पाळण्याचे स्वर जय गणेश प्रांगण येथे पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीत निनादले. जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात फुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सव कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आला होता. उत्सवाचे आयोजन सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेऊन महिला जय गणेश प्रांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आल्या. त्यानंतर बाळ शिवरायांचा पाळणा म्हणत महिलांनी शिवजन्मोत्सव साजरा केला. तसेच, यावेळी महिलांनी पोवाडा सादरीकरण देखील केले.

चार दिवसीय महोत्सवात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान, मंदार परळीकर यांचा अमर आग सांगीतिक कार्यक्रम, लेखक केतन पुरी यांचे व्याख्यान आणि मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे ५० कलाकारांसहित भव्य नाटक आयोजित करण्यात आले होते. पुणेकरांनी मोठया संख्येने या महोत्सवात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading