‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे मोफत रक्त तपासणी केंद्र सुरु
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत धनकवडी येथील शिवशक्ती तरुण मंडळाजवळ काशिनाथ पाटील नगर येथे मोफत रक्त तपासणी केंद्र सुरु करण्यात आले. नवीन वर्षातील ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात मोफत रक्ततपासणी केंद्राने झाली असून दररोज सुमारे ५० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते.
रक्त तपासणी अंतर्गत सीबीसी, रक्तगट, थायरॉईड, लिपिड, लिव्हर, शुगर, एसजीओटी/ एसजीपीटी, युरिया, ईएसआर, युरिन आदी १४ प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. याकरिता संबंधित डॉक्टरांची चिठ्ठी असणे आवश्यक आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, ट्रस्टच्या रुग्णसेवा अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये नव्या वर्षाचा प्रारंभ मोफत रक्ततपासणी केंद्राचा उपक्रम घेण्यात येत आहे. समाजातील गरजूंना विनामूल्य रुग्णसेवा देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असतो. या केंद्रामध्ये तपासणी करण्याकरिता ९१४६१४२०२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- वर्षभरात ५८७ रुग्णांचे ट्रस्टतर्फे मोफत ह्रदय आजार उपचार
ट्रस्टतर्फे मोफत ईसीजी, २ डीइको, एंजिओग्राफी तपासणी, एंजोप्लास्टी शस्त्रक्रिया, बायपास, पेसमेकर, लहान मुलांच्या ह्रदयास छिद्र असणे शस्त्रक्रिया, वॉल बदलणे आदी प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार वर्षभरात ५८७ रुग्णांचे करण्यात आले. सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, एम्स हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय, जहांगिर हॉस्पिटल, अॅकॉर्ड हॉस्पिटल, एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय अशा विविध रुग्णालय व डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत व माफत दरात उपचार करण्यात आले. - फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत धनकवडी येथील शिवशक्ती तरुण मंडळाजवळील काशिनाथ पाटील नगर येथे मोफत रक्त तपासणी केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी तपासणी करताना रुग्ण.
