Friday, October 9, 2026
Latest NewsSports

डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपमध्ये फॉर्मात परतण्यासाठी भारतीय गोल्फपटू शुभंकर शर्मा उत्सुक

दिल्ली गोल्फ क्लबवर १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रंगणार स्पर्धा
पुणे, – भारताचा गोल्फपटू शुभंकर शर्मा डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा दिल्ली गोल्फ क्लबमध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे याच ऐतिहासिक गोल्फ कोर्सवर शुभंकरने बालपणी खेळाचे बारकावे शिकले, अनेक आठवणी जपल्या आणि मोठ्या मंचावर खेळण्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळे त्याच्यासाठी हा भावनिक क्षण असणार आहे.
सुमारे ४० लाख डॉलर बक्षीस (सुमारे ३८ कोटी ७१ लाख रुपये) रक्कम असलेल्या या स्पर्धेत शुभंकर भारतातील एका प्रस्थापित आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात पुनरागमन करत आहे. या स्पर्धेत तो यंदाच्या वर्षी मधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळताना दिसेल. त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
या स्पर्धेची तिकिटे सध्या ‘झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट’ वर उपलब्ध आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी पाहता, यंदाच्या वर्षातील मेजर स्पर्धांनंतर ही जगातील सर्वांत आव्हानात्मक आणि आशियातील सर्वांत मोठी स्पर्धा ठरेल. दिल्ली गोल्फ क्लबसोबत बालपणापासूनच्या आठवणी जोडलेल्या शुभंकरसाठी ही मायदेशातील एक मोठी संधी आहे.
शुभंकर म्हणाला, मी दिल्ली गोल्फ क्लबमधील जागतिक गोल्फ स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे. हे माझ्यासाठीच नाही, तर सर्व भारतीय खेळाडूंसाठी एक अत्यंत खास ठिकाण आहे. मागील वर्षी अनेक अव्वल खेळाडू इथे आले होते आणि त्यांना हा अनुभव खूप आवडला होता. आता इतर खेळाडूंमध्येही या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अनेक खेळाडू आणि कॅडीजच्या मते दिल्ली गोल्फ कोर्स हा त्यांच्या संपूर्ण वर्षातील सर्वोत्तम कोर्सपैकी एक आहे; कारण या कोर्सला असलेला इतिहास आणि त्याची पारंपरिक शैली गोल्फपटूंसाठी खूप महत्त्वाची असते.
तो पुढे म्हणाल, की एकाच वर्षात ही स्पर्धा टूरवरील सर्वांत मोठ्या स्पर्धांपैकी एक बनली आहे. या वर्षातील चारपैकी तीन मेजर विजेत्यांसह जगातील अनेक दिग्गज खेळाडू यात सहभागी होत आहेत. त्यामुळे हा एक ब्लॉकबस्टर सोहळा असणार आहे.
२०२५ आणि २०२६ मध्ये लागोपाठ ‘मास्टर्स’ जिंकणारा रॉरी मॅकलरॉय या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्यासोबत अरॉन राय आणि रायन फॉक्सदेखील खेळणार आहेत. याचा अर्थ मास्टर्स, पीजीए चॅम्पियनशिप आणि ओपन चॅम्पियन्सचे विजेते दिल्लीत प्रत्यक्ष खेळताना दिसतील. याशिवाय या स्पर्धेचा गतविजेता टॉमी फ्लीटवुडदेखील मैदानात उतरेल. त्यांच्यासोबत मास्टर्स विजेता पॅट्रिक रीड, माजी यूएस ओपन विजेता जस्टिन रोज आणि ओपन विजेता शेन लोरी यांसारखे दिग्गज खेळाडूही खेळताना दिसतील. या सर्वांमध्ये भारताचा शुभंकर शर्मा एक असेल. अर्थात, त्याला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असेल. त्याचे घरचे मैदान असल्याने निश्चित फायदा त्याला होईल.
शुभंकरसाठी हा हंगाम फारसा सोपा राहिलेला नाही. अनेक स्पर्धांमध्ये कट पूर्ण न करता आल्यामुळे त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. क्लबमधील नवीन शाफ्ट्ससह उपकरणांमध्ये केलेल्या बदलांमुळे त्याला जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ लागला. तरीही, त्याची लय पूर्णपणे बिघडलेली नाही. सप्टेंबरमध्ये झालेल्या ‘ओमेगा युरोपियन मास्टर्स’मध्ये शुभंकरने पहिल्या फेरीत उत्कृष्ट ६-अंडर ६४ अशी कामगिरी केली. कोणतीही बोगी न करता खेळताना त्याने डीपी वर्ल्ड टूरच्या क्रमवारीत वेगाने पुढे जाणाऱ्या पूर्वीच्या शुभंकरची आठवण करून दिली. वीकेंडला त्याची कामगिरी थोडी घसरली, तरीही पहिले १८ होल्स त्याच्यातील क्षमता अजूनही कायम असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे होते.
ही स्पर्धा भारतीय खेळाडू आणि चाहत्यांसाठी किती महत्त्वाची आहे, यावर बोलताना शुभंकर म्हणाला, आमच्यासारख्या भारतीयांसाठी याचे महत्त्व खूप मोठे आहे. हे ठिकाण आणि ही स्पर्धा किती खास आणि ऐतिहासिक आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. वैयक्तिकरीत्या आम्ही या स्पर्धेची वाट पाहत आहोत. दिल्ली गोल्फ क्लबमध्ये माझ्या लहानपणीच्या खूप खास आठवणी आहेत.
त्याच्या फॉर्मबाबत शुभंकर म्हणाला, मला हवा तसा फॉर्म राहिलेला नाही. पण, मला विश्वास आहे की, मी पुन्हा आधीसारख्या लयीत येण्यापासून अवघा एक आठवडा दूर आहे. गेल्या वर्षी डीजीसीमध्ये दुसऱ्या दिवशी मी ६६ चा स्कोअर केला होता आणि माझी शॉट-स्ट्रायकिंग उत्तम झाली होती. सध्या, शेवटच्या काही स्पर्धांमध्ये मी काही गोष्टी सुधारल्या आहेत. माझा खेळ योग्य दिशेने जात आहे आणि मी काही चांगल्या फेऱ्या खेळत आहे. मला फक्त चारही फेऱ्यांमध्ये सातत्य राखून हा खेळ एकत्र करण्याची गरज आहे आणि मला आशा आहे की मी ते इथे करू शकेन.
शेवटी तो म्हणाला, गेल्या वर्षी भारतात पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा झाली होती, त्यामुळे त्याच्या यशाने मला खूप आनंद आणि उत्साह मिळाला होता. आता ही स्पर्धा त्याहूनही मोठी होणार आहे. इथे मोठ्या संख्येने लोक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी येतील. ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी गोल्फ स्पर्धा आहे आणि प्रेक्षक याला अधिक खास बनवतात. भारतातील प्रत्येक क्लबमधील प्रत्येक जण या स्पर्धेची वाट पाहत आहे. डीपी वर्ल्ड टूर आणि डीपी वर्ल्ड पीजीटीआय मुळे या स्पर्धेला एक भव्य स्वरूप मिळाले आहे.
शुभंकरसाठी या स्पर्धेतील खेळाडू आणि हा मंच भीतीदायक नसून एक मोठी संधी आहे. या स्तरावर खेळणे काय असते, हे त्याला चांगले ठाऊक आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याने डीपी वर्ल्ड टूरमध्ये दोनदा विजेतेपद मिळवले होते आणि असा पराक्रम करणारा तो सर्वांत तरुण भारतीय ठरला होता. आता, डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप दुसऱ्यांदा आयोजित होत असताना, शुभंकरसाठी ही स्पर्धा फॉर्ममध्ये परतण्याचा मार्ग ठरू शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading