भारतातील फाउंटन पेनप्रेमींसाठी पहिले ‘माय पेन कम्पॅनियन’ जर्नल पुण्यात प्रकाशित
पुणे : फाउंटन पेनप्रेमी आणि संग्राहकांसाठी विशेष तयार करण्यात आलेले ‘माय पेन कम्पॅनियन – अ जर्नल फॉर पेन एन्थुझियास्ट्स’ हे भारतातील अशा प्रकारचे पहिले जर्नल पुण्यात प्रकाशित करण्यात आले. फाउंटन पेन संग्राहक, शिक्षणतज्ज्ञ आणि छायाचित्रकार प्रा. वाय. डी. पिटकर यांच्या हस्ते या जर्नलचे प्रकाशन झाले. जगभरातील फाउंटन पेनप्रेमी आणि संग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पेलिकन हबच्या पुण्यातील मेळाव्यात नुकतेच या जर्नलचे अनावरण करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन पेलिकन हबचे पुण्यातील मास्टर सुरेंद्र करमचंदानी यांनी केले होते.
व्हीनस ट्रेडर्स / रायटिंग वंडर्स यांनी विकसित केलेल्या या जर्नलच्या केवळ ५२० क्रमांकित प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. व्हीनस ट्रेडर्सच्या ५२ वर्षांच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून ५२० हा आकडा निवडण्यात आला आहे.
भेटवस्तू म्हणून मिळालेल्या एका डायरीमध्ये पेनवर काहीतरी संदेश असलेल्या काही पानांमधून या जर्नलची संकल्पना सुचली. पेनप्रेमींसाठी पेनच्या संपूर्ण प्रवासाची नोंद ठेवणारे स्वतंत्र जर्नल असावे, या विचारातून ही संकल्पना पुढे विकसित झाली, असे व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी यांनी सांगितले. पेनप्रेमी आणि संग्राहकांच्या सूचना व अनुभवांच्या आधारे जर्नलचे स्वरूप निश्चित करण्यात आले. त्यात पेन, शाई, लेखनाचे अनुभव, पेनची देखभाल आणि संग्रह अशा विविध बाबींची नोंद करता येणार आहे. विशेष लेखन कागदाची निवड ही या जर्नलच्या निर्मितीतील महत्त्वाची बाब ठरली, असेही करमचंदानी म्हणाले.
मात्र हे जर्नल केवळ पेनच्या वैयक्तिक प्रवासाची नोंद ठेवणारे नाही, तर त्याच्या सुरुवातीच्या पानांमध्ये फाउंटन पेनविषयी माहितीपूर्ण आणि रंजक लेखांचाही समावेश आहे. यामध्ये प्रा. पटकी यांचा फाउंटन पेनविषयक लेख, ज्येष्ठ पेनप्रेमी युसुफ मन्सूर यांचा ‘द आर्ट ऑफ फाउंटन पेन केअर’, संदीप आवस्ती यांचा ‘कॅनराईट निब्स’, प्रा. डॉ. मनोहर देसाई यांचा ‘भारत की लेखन सामग्री’, विवेक कुलकर्णी यांचा ‘द लिव्हिंग व्हेसल’ तसेच फाउंटन पेनच्या आणि निब्च्या रचनेचा आणि विविध भागांचा परिचय करून देणारा लेख यांचा समावेश आहे. त्यामुळे हे जर्नल वैयक्तिक नोंदींसोबतच फाउंटन पेनप्रेमींसाठी माहितीचा आणि अनुभवांचा समृद्ध स्रोत ठरते.
“फाउंटन पेन हे केवळ लेखनाचे साधन नाही, तर ते वापरणाऱ्या व्यक्तीशी एक वेगळे नाते निर्माण करते. डिजिटल युगात फाउंटन पेनने लिहिणे म्हणजे काही काळ थांबून हाताने लिहिण्याचा आणि त्या लेखनाचा आनंद घेण्याचा अनुभव आहे,” असे प्रा. पिटकर यांनी सांगितले.
फाउंटन पेन क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. पिटकर यांना नुकताच कोलकाता येथील ‘इंक्डहॅपिनेस’चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद आणि आयआयटी खरगपूर यांसह विविध संस्थांमध्ये फाउंटन पेनच्या डिझाइनविषयी कार्यशाळा आणि व्याख्याने घेतली आहेत. सध्या ते तरुणांसाठी फाउंटन पेन आणि शाई या विषयावर पुस्तक लिहित आहेत.
पेलिकन हब हा जगभरातील फाउंटन पेनप्रेमी आणि संग्राहकांचा वार्षिक मेळावा असून, विविध देशांतील आणि शहरांतील हजारो पेनप्रेमी यात सहभागी होतात. पुण्यातील मेळाव्यात पेनप्रेमींना एकत्र येऊन अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करण्याबरोबरच आपले पेन संग्रह प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
