Friday, October 9, 2026
Latest NewsPUNE

संवेदनशीलता आणि सावधगिरीने संघर्ष टाळून सहजीवन शक्य

 

निसर्गसंवर्धक स्मिता राजहंस आणि प्राजक्ता हुशांगाबादकर यांचे प्रतिपादन

जंगलबेल्स वुमन ऑफ द वाईल्ड पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

पुणे : परस्पर संवेदनशीलता आणि योग्य ती सावधगिरी बाळगल्यास, मानव – वन्यप्राणी संघर्ष सहज टाळता येईल आणि दोघांनाही एकमेकांसोबत सहजीवन शक्य होईल, असे प्रतिपादन निसर्गसंवर्धनाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्त्रीशक्तीने मंगळवारी येथे केले. निमित्त होते वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जंगलबेल्स आयोजित विशेष कार्यक्रमाचे. जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ व संवर्धन कार्यकर्त्या प्राजक्ता हुशांगाबादकर यांना वन्यजीव तसेच निसर्गसंवर्धनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जंगलबेल्स वुमन ऑफ द वाईल्ड २०२६ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे (आयएफएस) यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, नीता कुलकर्णी, हेमांगी वर्तक व संजय देशपांडे उपस्थित होते.

स्मिता राजहंस आणि प्राजक्ता हुशांगाबादकर यांनी आपापल्या निसर्गसंवर्धन कार्याचा परिचय दृकश्राव्य माध्यमातून करून दिला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात कार्यरत असलेल्या स्मिता यांनी बिबट्या – मानव संघर्षाचे व्यवस्थापन, बिबट्यांच्या बछड्यांचे पुनर्वसन, विशेष बचाव व जेरबंदीच्या मोहिमा तसेच उसशेतीतील बिबट्यांच्या वास्तवाशी संबंधित आव्हानांवर काम केले आहे. प्राजक्ता या देशातील मानव आणि वन्यजीव संघर्ष समजून घेऊन, त्याचे व्यवस्थापन करणे, मांसाहारी प्राण्यांचे संवर्धन, संशोधन अशा कार्यात गुंतल्या आहेत.

स्मिता राजहंस यांनी आमच्यासाठी प्रत्येक आठवडा वन्यजीव सप्ताहच असतो, याचा उल्लेख केला. सामाजिक वनीकरण विभागात राष्ट्रीय हरित सेनेला २८ हजार विद्यार्थी जोडता आले. आम्ही विकसित व संवर्धित केलेल्या वृक्षाच्छादित प्रदेशाला वाघाने अधिवास मानून, ते य़शस्वी झाल्याची पावती दिली. वनविभागामार्फत निसर्ग संवर्धन, जतनाचे कार्य संरक्षण, जतन, व्यवस्थापन, संघर्षाच्या काळात संवेदनशील राहणे आणि बिबट्या निवारा केंद्राची जबाबदारी, अशा पद्धतीने सुरू असल्याचा उल्लेख केला.

प्राजक्ता यांनी संवर्धनाच्या कार्यपद्धतीमध्ये स्थानिक लोकसमुदायांना सामावून घेण्याची भूमिका योग्य ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवले. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या आता लक्षणीयरीत्या वाढत असून, त्याबद्दल समाधान वाटते, असे त्या म्हणाल्या.

आशिष ठाकरे म्हणाले, वनविभागात वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या महिलांची संख्या आणि त्यांचे काम लक्षवेधक आहे. ज्या विभागांत महिला काम करतात, तिथे त्या सर्व प्रकारे अग्रेसर आहेत. अनेक विषय त्या अधिक योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने हाताळून मार्ग काढतात. त्या सदैव उत्साही असतात आणि धडपडून काम करतात. कोणत्याही मुद्यासंदर्भात त्यांची बांधीलकी लक्षणीय ठरते. लिंगभेदातीत अशी कामाची ही क्षेत्रे असून, अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सुनील लिमये यांनी महिलांची वाढती संख्या स्वागतार्ह असून, त्यांच्या उत्तम कार्यपद्धतीमुळे वनविभागाची वाटचाल प्रतिक्रियात्मकतेकडून प्रतिसादाकडे होत चालल्याचे मत मांडले.

संजीवनी डेव्हलपर्सचे संजय देशपांडे यांनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलो, तरी यथाशक्ती निसर्गसंवर्धनाच्या उपक्रमांना साह्य करणे, ही जबाबदारी मानत असल्याची भावना व्यक्त केली.

प्रास्ताविकात हेमांगी वर्तक यांनी जंगलबेल्स संस्थेचा उद्देश, कार्य, उपक्रमांची माहिती दिली. या क्षेत्रात महिला दृष्टीकोन बदलण्याचे कार्य करू शकतात आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला, असेही त्या म्हणाल्या. अनुज खरे यांनी परीक्षकीय मनोगत मांडले. रोहन देशपांडे यांनी आभार मानले तर सोनल मारणे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading