१३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा उत्साहात समारोप
पुणे :भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या समृद्ध संगीत परंपरेला अभिवादन करणाऱ्या १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा नुकताच उत्साहात समारोप झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात शास्त्रीय गायन, तबला, संतूर, सतार आणि भरतनाट्यमच्या बहारदार सादरीकरणांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. महोत्सवा दरम्यान आमदार शंकर जगताप, उपमहापौर परशुराम वाडेकर, महोत्सवाचे आयोजक व द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, अजित गायकवाड, राधिका गायकवाड, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका व द औंध सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा भक्ती गायकवाड, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, पुणे मनपा विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, द औंध सोशल फाउंडेशनचे सचिव शिरीष नाईकरे, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह विविध मान्यवर, कलाकार आणि संगीतप्रेमी उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पं. श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग शुद्ध कल्याणमधील विलंबित व मध्यलय बंदिशी सादर करून रसिकांची दाद मिळवली. ‘तुम बिन कौन’ आणि ‘मंदर बाजो’ या बंदिशींसह ‘याचसाठी केला होता अट्टहास’ हा अभंग त्यांनी सादर केला. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे आणि तबल्यावर किशोर कोरडे यांनी साथ केली.
यानंतर उस्ताद अक्रम खान आणि जरघम खान यांच्या तबला जुगलबंदीने मैफलीत रंगत आणली. अजराडा घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कायदा, रेला आणि गत यांची त्रितालातील प्रस्तुती तसेच रूपक तालातील सादरीकरणातून तबलावादनाचे विविध पैलू रसिकांना अनुभवता आले. हार्मोनियमवर नीलय साळवी यांनी साथसंगत केली.
पहिल्या दिवसाची सांगता दीपिका भिडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मालकंस सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर भैरवीतील ‘तुज पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी’ या भजनाने त्यांनी मैफलीचा समारोप केला. त्यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे आणि तबल्यावर प्रणव गुरव यांनी साथ केली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याच्या युवा गायिका शाश्वती चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग पुरिया कल्याणमध्ये विलंबित झुमरा तालातील ‘आज सो बना’ हा बडा ख्याल आणि तीनतालातील ‘मोरे घर आजा’ हा छोटा ख्याल सादर केला. किराणा घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीचा ठसा उमटवणाऱ्या त्यांच्या सुरेल सरगमला रसिकांनी विशेष दाद दिली. ‘रूप पाहता लोचनी’ या अभंगाने त्यांनी भक्तिरसाची अनुभूती दिली. त्यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे, तबल्यावर ऋषिकेश जगताप आणि पखवाजवर सिद्धेश्वर उंडाळकर यांनी साथ केली.
यानंतर पं. बिपुल कुमार राय यांच्या संतूरवादनाने वातावरण सुरेल झाले. त्यांनी राग चंद्रकौंसमध्ये विलंबित झपताल तसेच मध्य आणि द्रुत तीनतालातील गती सादर केल्या. त्यानंतर मिश्र पहाडी धून सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तबल्यावर स्वप्नील भिडे यांनी साथ दिली.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात विदुषी अनुजा झोकरकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांनी राग रागेश्रीतील विलंबित एकतालातील ‘आली री पलक न लागी…’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत एकतालातील ‘देखो श्याम गेहलीनी…’ ही बंदिश, तसेच राग भैरवीतील टप्पा आणि ‘पनघट पे जल भरण में कैसे जाऊ…’ ही बंदिश सादर करून मैफलीची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी आणि तबल्यावर प्रणव गुरव यांनी साथसंगत केली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पं. शौनक अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र अभेद अभिषेकी यांच्या गायनाने रसिकांना सुरेल अनुभव दिला. त्यांनी राग मधुवंतीमध्ये विलंबित एकतालातील ‘एहो मोरे साही…’ आणि मध्यलय झपतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर तराना आणि अभंग सादर करून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर वरद सोहोनी आणि तबल्यावर गीत इनामदार यांनी साथ केली.
यानंतर रफिक खान यांच्या सतारवादनाने मैफलीत रंग भरला. त्यांनी राग झिंझोटीमध्ये झपताल आणि द्रुत तीनतालातील गत सादर केली. राग खमाजमधील दादऱ्याने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. तबल्यावर सोहम गोराणे यांनी समर्पक साथ दिली.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना उमा टिळक आणि त्यांच्या शिष्यांच्या सादरीकरणाने तीन दिवसीय महोत्सवाची सांगता झाली. ‘पंचतुंड नररुंद मालधर…’ या पारंपरिक नांदीने त्यांनी नृत्याची सुरुवात केली. त्यानंतर मीरा भजनावरील नृत्य सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. ‘कृष्णरंग’ ही त्यांच्या सादरीकरणाची मध्यवर्ती संकल्पना होती. यात कृष्णलीला, बालक्रीडा आणि कृष्णभजनांवरील विविध नृत्यरचना सादर करण्यात आल्या. ‘मंगलम्’मधील पंचतत्त्वांच्या सादरीकरणाने त्यांनी महोत्सवाचा दिमाखदार समारोप केला.
