Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

हजारो भक्तांच्या साक्षीने सामुहिक शंकरगीता पारायण सोहळा संपन्न 

पुणे : वंदुनी शंकर महाराज श्री शंकर, जन्म वृत्त कथन मनोहर, हा पहिला अध्याय सुंदर… अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगिराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय…च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शंकर महाराजांची महाआरती, महिमा, लिला, कथा, भजन आणि भक्तांना आलेली प्रचिती अशा विविधांगी अनुभूतीने एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा पुण्यात संपन्न झाला.

आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. एक दिवसीय शंकरगीता पारायण समिती, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार पुणे शहर, श्री शंकर महाराज भक्त परिवार पुणे शहर, श्री सद्गुरु चिले महाराज भक्त परिवार पुणे शहर यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन  दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनकवडी येथील शंकर महाराज मठाचे माजी विश्वस्त कन्हैया ऊर्फ कमलेश दुबे, तेजस मर्चंट, अनिल हगवने, श्रीधर साळुंखे, विलास सोनवणे यांनी केले. उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा असून सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली. यावेळी शंकरगीता सारामृताचे प्रकाशन देखील करण्यात आले.
सोहळ्यात सकाळी इष्टदैवत पीठ पूजन झाल्यानंतर शंकर गीता पारायणाला सुरुवात झाली. सर्व महिला भक्तांच्यावतीने ५६ भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच यावेळी शेकडो नारळ वापरून पिंड तयार करण्यात आली. सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला शंकरबाबा महाराजांची प्रतिमा, उपरणे आणि तुळशीरोपाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सादर झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading