Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी योगाभ्यास बरोबर भगवंताशी एकरूप व्हावे

जगद्गुरू शंकराचार्य प.प. विद्या नृसिंह भारती करवीर पीठ कोल्हापूर यांचे मत ; ‘योगतत्त्वोपनिषद’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

पुणे : तुम्ही योगी झालात आणि आत्मज्ञान प्राप्त झाले नसेल तर योगाचा काही उपयोग नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर योगाच्या माध्यमातून मनाला स्थिर ठेवता आले पाहिजे. मन स्थिर झाले तर आपले शरीर आपल्या ताब्यात राहिल. योगाच्या माध्यमातून शरीर प्रकृती नक्कीच ठिक राहील. परंतु आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी भगवंताशी एकरूप होणे गरजेचे आहे. मन स्थिर झाले तर तुम्ही भगंवताशी एकरूप होऊ शकता, असे मत करवीर पीठ कोल्हापूरचे श्री जगद्गुरु शंकराचार्य प.प. विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.

डॉ. आनंद बर्वे अनुवादित ‘योगतत्त्वोपनिषद’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ एरंडवणे सेंट्रल जवळील कै. गुळवणी महाराज पथ येथील सेवा भवनात संपन्न झाला. यावेळी मूत्र शल्य तज्ञ सुरेश पाटणकर, पं. वसंतराव गाडगीळ, लेखक डॉ. आनंद बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर पाहता याच्या विपरीत परिणामाची भिती देखील आहे. अशावेळी मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. योगाच्या माध्यमातून मनाची स्थिरता वाढविली पाहिजे. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी योग महत्वाचा आहे. पतंजली महामुनी यांनी सांगितलेल्या अष्टांग योगाचा विचार केला पाहिजे. केवळ आसनांचा विचार न करता यम, नियम, प्राणायाम व इतर अष्टांग योगाचा अभ्यास केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, योग, तत्व आणि उपनिषद याचा त्रिवेणी संगम आपल्याला या पुस्तकात वाचता येणार आहे. त्यातील योग हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जर नित्य योगाभ्यास कराल तर शेवटच्या श्वासापर्यंत निरोगी राहाल. योगाभ्यास हा आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्राचीन ऋषी आणि शंकराचार्यांनी देखील त्यांच्या जीवनात योगाचा मार्ग अवलंबला होता, असे ही त्यांनी सांगितले.

डाॅ. आनंद बर्वे म्हणाले, आपल्याकडे असणाऱ्या योग शास्त्राची माहिती ही सर्वांना व्हावी. त्याचबरोबर योगशास्त्रातील संस्कृतमधील मूळ ग्रंथ अभ्यासायला मिळावेत. त्याचे ज्ञान सर्वसामान्यपर्यंत पोहचावे, हा उद्देश समोर ठेवून हे ग्रंथ मराठीत आणता येतील का ? त्यातील विषय समजावा, या दृष्टीने काही भाष्य लिहिता येईल का? हा विचार करून या पुस्तकाची निर्मिती केली. परंतु फक्त ज्ञान प्राप्त न होता योगामध्ये संशोधन देखील झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संजय गंभीर यांनी सूत्रसंचलन केले. डाॅ.आनंद बर्वे यांनी प्रास्ताविक केले. ऋचा बर्वे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading