Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सवाई तिसरा दिवस उत्तरार्ध; नीलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने स्वरमंडपात चैतन्यलहरी

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या झंकारांनी स्वरमंडपात चैतन्यलहरी उसळल्या. सवाईच्या मंडपात रसिकांची हाऊसफुल्ल गर्दी सतारवादक पं. नीलाद्रीकुमार यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. स्वरमंचावरील त्यांच्या आगमनाची श्रोत्यांना उत्सुकता होती. जगविख्यात सतारवादक पं. रविशंकर रचित ‘यमन मांझ’ रागाने नीलाद्रीकुमार यांनी वादनाला आरंभ केला.

घराण्याची शिस्त न मोडता स्वत:ची पूर्णपणे स्वतंत्र शैली नीलाद्रीकुमार यांनी विकसित केली आहे. विलंबित लयीवर कमालीचे प्रभुत्व दर्शवणाऱ्या त्यांच्या वादनाने सुरवातीपासूनच श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली. राग पंडित राविशंकर यांचा, पण राग विचार आणि रागमांडणी नीलाद्री यांची स्वतःची असल्याने त्यांच्या वादनाने स्वरमंडपात चैतन्य निर्माण केले. प्रत्येक आवर्तनाला रसिक टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते.

वादनाच्या अखेरीस नीलाद्रीकुमार यांनी रसिकांच्या आग्रहाला मान देत धून पेश केली. याचवेळी स्वरमंडपात ज्येष्ठ सतारवादक, नीलाद्रीकुमार यांचे गुरू आणि वडील पं. कार्तिककुमार यांचे आगमन झाले. त्यांचे आगमन होताच नीलाद्रीकुमार यांनी ‘बाबांनी लहानपणी शिकवलेली धून सादर करतो’ असे सांगून एक छोटेखानी रचना पेश केली. त्यांच्या वादनाला सत्यजीत तळवलकर यांनी अतिशय पूरक अशी तबलासाथ करून मैफलीची रंगत वाढवली.

यावेळी संवाद साधताना नीलाद्री कुमार म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव  हा माझ्यासाठी केवळ मंच नाही तर मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला मंदिरात जातो तसा मी येथे येतो. मी जगभरात, भारतभर सादरीकरण करतो मात्र सवाई सारखा महोत्सव आणि पुण्यासारखे रसिक श्रोते कोठेच नाहीत. आज माझे वडील देखील येथे मला ऐकायला आले हे माझ्यासाठी सरप्राईज होते. श्रीनिवास जोशी यांनी ते येत आहेत म्हणून मला १५ मिनिटे वेळ वाढवून दिली ती का दिली हे माझे वडील आल्यावर समजले.”

नीलाद्री कुमार यांच्या सादरीकरणानंतर बोलताना पं कार्तिककुमार म्हणाले, “मी खूप वर्षांआधी माझ्या गुरुंसोबत सवाईमध्ये सादरीकरण केले आहे. मात्र नीलाद्री सोबत येथे सादरीकरण केलेले नाही. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा अमर आहे असे मी मानतो.” भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, पं भीमसेन जोशी यांचे संगीत अमर होते.नीलाद्रीला मिळत असलेले रसिकांचे प्रेम आणि आशीर्वाद असाच पुढेही मिळत राहो अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading