सातव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेचे १७ डिसेंबर पासून आयोजन !
पुणे : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे सलग सातव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या आंतर फुटबॉल अॅकॅडमी स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध वयोगटातील ६४ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ पासून हॉटफुट अॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर होणार आहेत.
हॉटफुट अॅकॅडमी तर्फे ही स्पर्धा ९, ११, १३ आणि १५ वर्ष वयोगटामध्ये खेळवण्यात येणार आहे. लहान वयोगटात स्पर्धा खेळवण्याची संधी मिळावी व फुटबॉल क्रिडाप्रकारची रूची निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पर्धेचे संचालक अॅश्ले ब्रिगॅन्झा यांनी सांगितले. स्पर्धेला अपोलो टायर्स यांनी मुख्य प्रायोजकत्व दिले असून स्पर्धेच्या सलग सातव्या वर्षी त्यांनी आर्थिक पाठींबा दिला आहे.
स्पर्धेमध्ये आयोजक हॉटफुट अॅकॅडमी, बेंगलूरू एफसी एलिट ब्ल्युज्, ब्राका फुटबॉल अॅकॅडमी, स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी, उत्कर्ष क्रिडा मंच, फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमी, स्पोर्टीको फुटबॉल अॅकॅडमी, लौकिक फुटबॉल अॅकॅडमी, स्पोर्ट्स मेनिया क्लब, सिग्मय फुटबॉल क्लब, पुणे सॉकर क्लब, गो प्रो फुटबॉल अॅकॅडमी, एसपीजे अॅकॅडमी, साई फुटबॉल अॅकॅडमी, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी आणि मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.
अपोलो टायर्स हॉटफुट करंडक ही स्पर्धा १७ डिसेंबर पासून दोन महिन्यांच्या कालावधीत खेळवण्यात येणार असून दर रविवारी गटसाखळी पद्धतीने सर्व वयोगटातील स्पर्धेचे सामने होणार आहेत. प्रत्येक वयोगटात सहभागी असलेले १६ संघ १५ साखळी सामने खेळणार असून सामन्यातील गुणांनुसार अंतिम विजेते ठरणार आहेत.
साखळी आणि बाद पद्धतीमध्ये होणारी ही स्पर्धा दर रविवारी होणार आहे. स्पर्धेच्या ९, ११, १३ आणि १५ वर्ष या प्रत्येक वयोगटामध्ये १६ संघ सहभागी झाले आहेत. ९ आणि ११ वर्षाखालील स्पर्धा ६-अ-साईड, १३ वर्षाखालील ८-अ-साईड आणि १५ वर्षाखालील स्पर्धा ९-अ-साईड या पद्धतीने होणार आहे.
स्पर्धेतील ९, ११, १३ आणि १५ वर्ष वयोगटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघ आणि खेळाडूंना करंडक आणि पदक मिळणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल स्कोरर अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धा २०२२ वर्षीच्या सहाव्या मौसमातील विजेते आणि उपविजेतेः
८ वर्षाखालील गटः ४ लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ; पुणे ब्ल्यु क्लब;
१० वर्षाखालील गटः ४ लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ; ४ लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी क;
१२ वर्षाखालील गटः ४ लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ; लौकिक फुटबॉल अॅकॅडमी ब;
१४ वर्षाखालील गटः ४ लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी अ; मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमी.
