Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

भागवत हा ज्ञानमय व धर्ममय ग्रंथ – शंकराचार्य विद्या नृसिंह भारती

पुणे : भक्ती मुळे मन शुद्ध होईल आणि मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरीत्या आत्मसात करता येईल. भागवत ग्रंथ हा केवळ भक्ती ग्रंथ नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ आहे, असे मत करवीर पीठाचे प.पू.शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने लाल महाल येथे ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांचे गौरवार्थ “पुणे कीर्तन महोत्सव २०२३”चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार डोंबिवलीचे ह.भ.प. आनंदबुवा जोशी यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंगलमूर्ती औरंगाबादकर, अरुणकुमार बाभुळगांवकर आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी,उपरणे, पोषाख, स्मृतिचिन्ह व रुपये पाच हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शंकराचार्य विद्या नृसिंह भारती म्हणाले, एकदा परमात्म्याचे ज्ञान झाले की मोक्षाचा मार्ग देखील गवसेल. आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवताचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी या ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास आपण करू त्यावेळी भागवत ग्रंथाचा खरा अर्थ आपल्याला समजेल.

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, सन २०२४ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे औचित्य साधून पुण्यात कीर्तनाचे माध्यमातून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील विविध कीर्तनकारांनी महोत्सवात आपली सेवा दिली आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नृसिंह वाडीचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शरदबुवा घाग यांनी कीर्तन केले. होनराज मावळे याने तबल्याची व स्वानंद नेने यांनी ऑर्गनची साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार ने केले. महोत्सवात जयश्री देशपांडे, कृष्णांत नाईक, प्रसाद धरणगावकर यांनी विशेष सहयोग दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading