fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsLIFESTYLE

अंधत्वापासून बचाव करण्यासाठी मधुमेह ठेवा नियंत्रणात

पुणे : आज जगात मोठ्या प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारात अनियमितता, ताणतणाव यामुळे मधुमेहाचा आजार बळावत चालला आहे. मधुमेहापासून खरेतर अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. परंतु त्यातल्या त्यात मधुमेहाचा सर्वाधिक फटका हा डोळ्यांना बसण्याची शक्यता असते. त्यामुळेच असे म्हटले जाते की, मधुमेह आणि अंधत्व यांचे फार जवळचे नाते आहे.
एकीकडे ही परिस्थिती असताना आज जागतिक स्तरावर मधुमेहाला नियंत्रित करण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मधुमेहाप्रति जनजागृती हा एक महत्वाचा विषय समोर आलेला आहे. याप्रमाणेच मधुमेहामुळे डोळ्यांना होणारे आजार आणि त्यातून येणारे संभाव्य अंधत्व यासंदर्भातही व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. मधुमेहामुळे येणारे अंधत्व ही बाब जास्त गंभीर यासाठीही आहे की, साधारणतः २० ते ७० या वयोगाटीतल लोकांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या वयोगटातील नागरिक हेच सर्वाधिक कामकरी असतात. त्यामुळे त्यांच्या एकंदर कामकाजावर आणि उपजीविकेवर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. पर्यायाने यावर लवकरात लवकर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
एशियन आय हॉस्पिटल च्या  डायबेटिक नेत्ररोग आणि मोतीबिंदू तज्ञ डॉ. श्रुतिका कांकरिया म्हणाल्या  की इंटरनॅशनल डायबिटीज जनरेशनच्या संशोधनानुसार आज जगात १४५ दशलक्ष लोक डायबेटिक रेटिनोपॅथी आणि ४५ दशलक्ष लोक धोकादायक डायबेटिक रेटिनोपॅथीने ग्रस्त आहेत. २०४० पर्यंत ही संख्या अनुक्रमे २२४ दशलक्ष आणि ७० दशलक्षांपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. यावरून या आजाराची व्याप्ती आणि तिची धोकादाय परिस्थिती आपल्यासमोर आज उभी आहे.

यामध्ये चांगली बातमी अशी आहे की, मधुमेहाचे अंधत्व  पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे. फक्त त्यासाठी आवश्यकता आहे ती इच्छाशक्तीची आणि थोड्या प्रयत्नांची; परंतु यात वाईट बातमी ही आहे की, मधुमेह रेटिनोपॅथी रोग अपरिवर्तनीय आहे. म्हणजे एकदा तो  मधुमेही अंधत्वाचा धोका लवकर ओळखून आणि वेळेवर योग्य उपचाराने लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो. हा आजार लवकर ओळखणे हे खरंतर एक मोठं आव्हान आहे, कारण अनेक रुग्णांना मधुमेहामुळे अंधत्व येते हे माहितच नसते. बऱ्याचदा लोक मधुमेह असण्याचेच नाकारतात. या स्थितीत मधुमेह गंभीर स्थितीला जाऊन त्याचे डोळ्यांवर भविष्यात गंभीर परिणाम दिसू शकतात.

मधुमेहाकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या आजाराच्या सुरुवातीच्या काळात कोणतीही गंभीर लक्षणे किंवा चिन्हे दिसून येत नसतात. आपण हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे कि रक्तातील साखरेमुळे ह्दय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू आणि जवळजवळ प्रत्येक अवयव तसेच ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्वांचा पुरवठा करणाऱ्या लहान केशिका व रक्तवाहिन्यांचे हळूहळू नुकसान होत जाते. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यतः डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा धोका असतो. टाईप १, टाईप २ आणि गरोदरपणातील मधुमेह (गर्भधारणे दरम्यान मधुमेह ) असलेल्या लोकांचा यात समावेश होतो.

Leave a Reply

%d