Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मुलांच्या जीवनशैलीत वाचनाला स्थान नाही – प्रा. मिलिंद जोशी

पुणे : सध्या बालकुमारांसाठीचे उत्तम साहित्य देखण्या रुपात प्रसिध्द होत आहे पण या बालकुमारांना वाचनासाठी कसे प्रवृत्त करायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोना काळात लागलेले मोबाईलच्या वापराचे व्यसन उग्र रूप धारण करताना दिसत आहे. मुलांच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाचन आणि खेळ या महत्वाच्या गोष्टींना स्थान नाही, अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी बसविणाऱ्या मसाप शाखेला देण्यात येणारा डॉ. न. म. जोशी मराठी भाषा संवर्धन पुरस्कार मसाप सासवड शाखेला प्रा. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह माधव राजगुरू उपस्थित होते. सासवड शाखेचे प्रमुख पदाधिकारी विजय कोलते, अॅड. प्रकाश खाडे, प्रा. सतीश पाटील, बंडू काका जगताप, कुंडलिक मेमाणे, सुरेश कोडितकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी विषयात पुणे विभागात प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यांना मसाप तर्फे देण्यात येणारा अक्षरयात्री पुरस्कार श्रेया संदीप माने (पुणे) व सृष्टी रमेश पवार (नेवासा) यांना प्रा. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. जोशी म्हणाले, मुलांना मराठी भाषेशी खेळायला शिकवले पाहिजे, त्यातली गोडी त्यांना समजली तर त्यांच्या मनात भाषा आणि साहित्याविषयी प्रेम निर्माण होईल. अन्य भाषा उत्तम बोलता, लिहिता आणि वाचता येण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ते निर्माण व्हावे यासाठी परिषदेतर्फे परीक्षा घेतल्या जातात. पालक आणि शिक्षक  पुस्तक वाचताना दिसले तरच मुले पुस्तकं  वाचणार आहेत. आई आणि बाबा यांनी मुलांना रेसचे घोडे बनविले आहे. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी या  त्यांच्या अपेक्षेत  गैर काहीच नाही पण ती ठेवताना मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे. अस्वस्थ वर्तमानाचे पडसाद मुलांच्या भावविश्वावर पडून त्यांचे  बालपण कोमेजून जावू नये आणि  परिकथेत रमण्याच्या वयात त्यांना अकाली प्रौढत्व येऊ नये याची खबरदारी पालक आणि शिक्षक यांनी घ्यायला हवी. माधव राजगुरू यांनी प्रास्ताविक केले, सतीश पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading