Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे  विदित गुजराथी खेळाडू, तर अभिजीत कुंटे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात 

पुणे :  महाराष्ट्रातील नाशिकचा विदीत गुजराथी आणि ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांची आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या बुद्धिबळ संघात निवड झाली आहे. विदीत खेळाडू , तर कुंटे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाबरोबर जातील. 
 
विदीत नाशिकचा रहिवासी असून, ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे. लक्ष्य फाउंडेशन, भारत फोर्ज, पर्सिस्टंट सिस्टिम यांचा विदीतला आर्थिक पुरस्कार मिळतो. 
 
अभिजित कुंटे हे पुण्यातील रहिवासी असून, इंडियन ऑईल महामंडळात सेवेत आहेत. मेजर ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी राहिलेले कुंटे यांनी अनेकदा महिला संघाला मार्गदर्शन केले आहे. 
 
बुद्धिबळाचा १३ वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी २०१० मध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला होता. भारत आणि चीन हे दोन संघ या क्रीडा प्रकारात बलवान मानले जात आहेत. 
 
विदीतसह पी. हरिकृष्णा,  आर. प्रग्यानंद, डी, गुकेश, अर्जुन एरिगसी असा भारतीय संघ आहे. विदीत आणि अर्जुन हे सांघिक आण वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात खेळणार आहेत.
 
अभिजित कुंटे यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जागतिक सांघिक स्पर्धेत महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. महिला संघ वैयक्तिक जलद आणि सांघिक जलदगती प्रकारात सहभागी होणार आहे. कोनेरु हम्पी, द्रोणावली हरिका, वैशाली रमेशबाबू, सविता श्री बी आणि वंतिका अग्रवाल असा महिला संघ असेल. हम्पी आणि हरिका या वैयक्तिक आण सांघिक अशा दोन्ही प्रकारात खेळणार आहे. 
 
विदीत गुजराथी म्हणाला, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना खूप आनंद होत आहे. स्पर्धेचे स्वरुप मनोरंक असून, वयैक्तिक आणि सांघिक लढती खेळताना कौशल्य पणाला लागेल. कोलकता येथील शिबिरात चांगला सराव झाला आहे. सर्वच खेळाडूंना आता स्पर्धेत खेळण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आमच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत. पदक मिळविण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू.’ 
 
अभिजित कुंटे म्हणाले, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचे पुनरागमन लक्षणी. आहे. बुद्धिबळ पुन्हा आशियाई स्पर्धेत खेळले जाणार असल्यामुळे सगळ्या खेळाडूंमध्ये वेगळेच वातावरण आहे. सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावलेले असून, तयारी जोरात सुरु आहे. भारतीय खेळाडू पदक मिळवून देशाचा अभिमान उंचावतील.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading