fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे भारतावर दायित्व – डॉ. मोहन भागवत

पुणे : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या अभिजित जोगविचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सिम्बॉयोसिस विश्वभवन सभागृहात झाले, त्यावेळी डॉ. भागवत बोलत होते. ‘दिलीपराज प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित, दिलीपराज प्रकाशनाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव बर्वे, अभिजित जोग यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

जगभरच्या सर्व मंगलाविरोधातच डावे आहेत. त्यामुळे सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली जगभर व विशेषत: पाशात्य देशांत डाव्यांनी मांगल्याच्या विरोधात भूमिका घेत विध्वंस सुरू केला आहे. विमर्शाच्या नावाखाली चुकीचे विचार समाजात रुजवण्याचे प्रयत्न डाव्यांनी सुरू केले आहेत. त्यातून समाजाचे नुकसानच होत असून, मानवी वर्तन पशुत्वाकडे झुकते आहे. डाव्यांचे हे संकट आता भारतावरही येते आहे. आपल्या समाजातच नव्हे, तर घराघरांपर्यंत ते पोचते आहे. त्यामुळेच भारतीय समाजाने अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.

आज आपल्याला दिसतो हा संघर्ष नवा नाही. देव आणि असुरांमधील संघर्षाचेच हे आधुनिक रूप आहे, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, “डाव्यांच्या या संकटातून वाचवण्याचे सामर्थ्य भारतीय संस्कृती आणि सनातन मूल्यांत आहे. डाव्यांचा विमर्श खोडून काढण्यासाठी सत्य, करूणा, सूचिता आणि तेजस या चतु:सूत्रीचा अंगिकार समाजाने केला पाहिजे. आपली सनातन मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजेत. भारताने इतिहासकाळापासून अशी संकटे पचवली असून, हे संकट पचवण्याचीही भारतीय समाजात ताकद आहे. सनातन मूल्यांची कास धरून सर्व समाज हे काम करू शकतो. त्यासाठी अशी अनेक पुस्तके सर्व भाषांमधून प्रकाशित झाली पाहिजेच. अन्य मार्गांनीही आपली मूल्ये, आपला विचार घराघरापर्यंत पोचवला पाहिजे. हे कोणा एका संघटनेचे काम नसून सर्व समाजाचे हे दायित्व आहे. त्यातून आपण फक्त आपला देशच नव्हे, तर जगालाही या संकटा पासून मुक्त करू शकतो”, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

“डाव्यांनी आपला विचार पुढे रेटण्यासाठी, तसेच तो प्रस्थापित करण्यासाठी भक्कम इको सिस्टीम उभी केली आहे. डाव्यांना चोख वैचारिक उत्तर देण्यासाठी आपणही अशीच भक्कम इको सिस्टीम उभी केली पाहिजे. आपले विचार, आपली मूल्ये जगापुढे मांडताना आपण घाबरू नये”, असे डॉ. पंडित यांनी सांगितले. “ईर्ष्या, द्वेष व अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे.त्यातून जगभर ते कसा विध्वंस करत आहेत, याचे चित्रण आपण या पुस्तकातून केले आहे”, असे जोग यांनी सांगितले.

बर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हे संस्थेचे २७९० वे पुस्तक असल्याची माहितीही त्यांनी दिली. सिम्बॉयोसिस संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार व डॉ. विद्या येरवडेकर यांनी डॉ. भागवत यांचा सन्मान केला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: