fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हायला हवा – चंद्रकांत पाटील

पुणे : आपणा भारतीयांना स्वत:चा असा इतिहास नाही, पूर्वज, परंपरा नाहीत, शिक्षणपद्धती नाही हे ब्रिटीशांनी जाणूनबुजून स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या मनात ठसवले. आज खूप मोठी पिढी हेच सत्य आहे, असे मानून वावरत असताना न्यूनगंड बाळगणाऱ्या या पिढीसमोर आपल्या पूर्वजांचे गौरवास्पद काम आणणारे, ऐतिहासिक स्मृती जागविणारे कार्यक्रम व्हायला हवेत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्याची ओळख असलेल्या शनिवारवाड्यासमोरील दगडी कमानीचा देखणा नवा पूल अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पूल बांधकामाची १०० वर्षे साजरी करीत असताना त्याचे बांधकाम करणाऱ्या रावबहादूर गणपतराव महादेव केंजळे यांचे वंशज असलेल्या केंजळे कुटुंबियांच्या वतीने महापालिकेच्या समोरील रस्त्यावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पुलाची माहिती सांगणाऱ्या नूतन फलकाचे अनावरण आज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, रमेश केंजळे, मिलिंद केंजळे, कुबेर केंजळे, अभिजित केंजळे आणि इतर केंजळे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये नव्या पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास माहिती व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. एके काळी भारताचा जगाशी असलेला व्यापार हा ३२ टक्के इतका होता इंग्रज भारत सोडून जाताना तोच व्यापार ३% इतका झाला. यावरून त्यांनी भारताला किती लुटले हे लक्षात येते. आज उभा असलेला हा नवा पूल जर आपल्या पूर्वजांनी बांधला आहे तर त्याचे श्रेय आपल्याला घ्यायला हवे. यासाठी आवश्यक कार्यक्रमांचे आयोजन व्हायला हवे. नव्या शैक्षणिक धोरणात आम्ही ३ वर्षांची पदवी ४ वर्षे ही याच साऱ्या गोष्टी शिकता याव्यात म्हणून केली आहे.”

अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांची आठवण बाळगणे, अभिमान बाळगणे हा केंजळे कुटुंबियांचा स्वभाव कौतुकास्पद असून यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो असे सांगत पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर आपण ब्रिटीश नावे बदलत चाललो आहोत ही महत्वाची गोष्ट आहे. या पुलाची वास्तुरचना भक्कम असून मागील १०० वर्षात याचे कोणतेही मोठे काम निघाले नाही. तत्कालीन नगरपालिका, महानगरपालिका यांनीही याची योग्य काळजी घेतली.”

इतिहासाच्या स्मृती जागविणाऱ्या अशा कार्यक्रमांना महानगरपालिका देखील सहकार्य करीत असून समिती नेमा, चौकशी करा अशा पद्धतीचा त्यांचा प्रशासकीय कामाचा अविर्भाव नाही याबद्दल पुणे महानगरपालिकेचेही पाटील यांनी कौतुक केले.

या कोनशीला अनावरण कार्यक्रमानिमित्त पुलाची स्वच्छता करीत, रांगोळीच्या पायघड्या घालत पुलाची सजावट करण्यात आली होती. रंगरंगोटीकरीत ढोल ताशाच्या गजरात १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पुलाच्या शंभरीचेचे औचित्य साधत एका विशेष माहितीपटाची निर्मिती केंजळे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली असून त्याचे प्रकाशन कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे विशेष सहकार्य लाभले होते मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक देखील यावेळी उपस्थित होते.

पुलाबद्दल माहिती सांगणारा हा माहितीपट https://youtu.be/-o0-9te4MA8 युट्यूब वर उपलब्ध आहे

Leave a Reply

%d bloggers like this: