चर्चिल यांचे ओल्ड वॉर ऑफिस हिंदुजा ग्रुपचे लंडनमधील नवीन लक्झरी हॉटेल म्हणून पुन्हा खुले होणार
मुंबई : १०९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा यशस्वीपणे पुढे चालवत असलेला, कित्येक बिलियन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेला बहुराष्ट्रीय उद्योगसमूह, हिंदुजा ग्रुपने जागतिक कीर्ती संपादन केलेल्या रॅफल्स हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत हातमिळवणी करून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या ओल्ड वॉर ऑफिसला पुनर्स्थापित केले आहे. लंडन शहरात मध्यभागी असलेल्या ओल्ड वॉर ऑफिसचे रूपांतर एका नवीन लक्झरी हॉटेलमध्ये करण्यात आले असून त्याचे उदघाटन २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे निरीक्षण करणारे संजय हिंदुजा यांनी सांगितले, “जेव्हा आम्ही व्हाईटहॉलला आलो, तेव्हा या भव्य इमारतीच्या आकाराने आणि सौंदर्याने टीम भारावून गेली.”
ते पुढे म्हणाले, “या जागेला तिचे पूर्वीचे वैभव मिळवून देताना, तिच्या वारशाचा सन्मान करताना, तिला नवसंजीवनी मिळवून देण्यात खर्चात जराही तडजोड करण्यात आलेली नाही. रॅफल्स लंडनच्या सहयोगाने द ओडब्ल्युओमध्ये आम्ही असा वारसा निर्माण करू जो कालातीत व अतुलनीय ठरेल.”
हिंदुजा परिवाराने आठ वर्षांपूर्वी डाऊनिंग स्ट्रीटच्या समोरील व्हाईटहॉलवर ऐतिहासिक इमारत विकत घेतली आणि तिचे रूपांतर आलिशान निवास, रेस्टॉरंट्स आणि स्पा यांनी सुसज्ज असलेल्या एका विलक्षण हबमध्ये करण्यासाठी रॅफल्स हॉटेल्सशी करार केला.
१९०६ साली बांधून पूर्ण करण्यात आलेल्या ओल्ड वॉर ऑफिसचे डिझाईन ब्रिटिश वास्तुविशारद विल्यम यंग यांनी केले होते. हे खरेतर व्हाइटहॉलच्या मूळ राजवाड्याचे ठिकाण होते. विन्स्टन चर्चिल आणि डेव्हिड लॉयड जॉर्ज सारख्या प्रभावशाली राजकीय आणि लष्करी नेत्यांच्या कारकिर्दीत ही इमारत जगाला आकार देणाऱ्या अनेक घटनांची साक्षीदार होती. वास्तुकला अतिशय भव्य असल्यामुळे ही इमारत जेम्स बॉन्ड चित्रपटांमध्ये आणि अगदी अलीकडच्या ‘द क्राऊन’ या नेटफ्लिक्स या मालिकेत बॅकड्रॉप म्हणून वापरली गेली.
अकॉरचे चेअरमन आणि सीईओ सेबॅस्टियन बॅझिन यांनी सांगितले, “सर्वांच्या अपेक्षांपेक्षा सरस ठरलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पाचा आम्ही एक भाग आहोत याचा अकॉरमधील प्रत्येकाला अतिशय अभिमान वाटतो. हे या ग्रहावरील सर्वात आश्चर्यकारक हॉटेल ठरणार आहे.”
ते म्हणाले, “हिंदुजा कुटुंबासोबत, आम्ही अतिशय अभिमानाने स्थानिकांना आणि प्रवाशांना या विलक्षण हॉटेलचा तसेच रॅफल्स या जगातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँडची सत्यता व कृपाळूपणा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो.”
नूतनीकरणाचा एक भाग म्हणून, शेकडो कारागिरांच्या मदतीने अंतर्गत सजावटीतील ऐतिहासिक घटक पुनर्स्थापित करण्यात आले आहेत, यामध्ये हातांनी बनवण्यात आलेले नाजूक मोझाईक फ्लोर्स, ओक पॅनेलिंग, चमचमणारे झुंबर आणि भव्य संगमरवरी जिना यांचा यामध्ये समावेश आहे. द ओडब्ल्युओमध्ये पाहुण्यांसाठी १२० खोल्या व सूट्स आहेत, शेफ मौरो कोलाग्रेकोचे खास जेवण आणि मनोरंजनासाठी भव्य बॉलरूम यांचाही अनुभव याठिकाणी घेता येईल.
इमारतीच्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण भागात हेरिटेज सूट, तिच्या इतिहासाशी संबंधित प्रभावशाली राजकीय आणि लष्करी नेत्यांची पूर्वीची कार्यालये आहेत.
यापैकी अनेकांचे विशेष रिझर्वेशन करता येईल.”द व्हाईटहॉल विंग”, इमारतीच्या पश्चिम भागात असलेला सहा बेडरूमचा सुट ज्यामध्ये १२ पाहुणे राहू शकतील. हा लंडनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या लक्झरी हॉटेल विंगपैकी एक असणार आहे.
रॅफल्स लंडन ऍट द ओडब्ल्युओचे मॅनेजिंग डायरेक्टर फिलिप लेबोउफ म्हणाले, “रॅफल्स लंडनमध्ये, पूर्वीच्या ओल्ड वॉर ऑफिसचा इतिहास, त्याच्या भव्य वास्तुकलेतुन, काळजीपूर्वक निवडलेल्या इंटीरियर डिझाइनमधून आणि विशाल हेरिटेज सूट्समधून जपला गेला आहे. ज्यासाठी रॅफल्स जगभरात ओळखले जाते अशा आमच्या अतिशय पर्सनलाइज्ड आणि इंट्यूटिव्ह सेवा आमच्या पाहुण्यांना पुरवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या अतुलनीय ठिकाणी जागतिक दर्जाची रेस्टोरंट्स आणि बार यांचा अनुभव पाहुण्यांना मंत्रमुग्ध करेल.”
कायापालट झालेल्या ओडब्ल्युओमध्ये लंडनचा नवीन कलनरी डिस्ट्रिक्ट म्हणून इमारतीची पुनर्कल्पना करण्याचा एक भाग म्हणून रॅफल्सची ८५ निवासस्थाने देखील आहेत, याठिकाणी नऊ नवीन रेस्टॉरंट्स आणि तीन बार आहेत, एक छत देखील आहे जिथून बकिंगहॅम पॅलेसचे विहंगम दृश्य पाहता येते.